आय लव्ह यू ऐश्वर्या’चा टिझर पोस्टर प्रदर्शित…

आय लव्ह यू ऐश्वर्या’चा टिझर पोस्टर प्रदर्शित…

मराठी सिनेसृष्टीत नेहमीच नवनवीन संकल्पनांवर आधारित सिनेमे बनत असतात. यात प्रेमकथांची संख्या अधिक असली तरी प्रत्येक प्रेमकथेमध्ये प्रेमाचे नवनवीन पैलू उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येतो, त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकताही ताणली जाते आणि प्रेमकथा यशस्वी होतात. यापैकी विनोदाची किनार जोडलेल्या संगीतमय प्रेमकथा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवतात. आता लवकरच आणखी एक अशीच लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ज्यात प्रेक्षकांना आजवर कधीही न उलगडलेले प्रेमाचे पैलू पहायला मिळणार आहेत. या मराठी सिनेमाचं शीर्षक ‘आय लव्ह यू ऐश्वर्या’ आहे. या सिनेमाचा टिझर पोस्टर नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून लाँच करण्यात आला आहे.
“मिराज क्रिएशन्स’’ची प्रस्तुती आणि मदन पालीवाल यांची निर्मिती असलेल्या ‘आय लव्ह यू ऐश्वर्या’ची सहनिर्मिती सोनल देशपांडे यांनी केली असून या सिनेमाचं दिग्दर्शन जिगर नागदा यांनी केलं आहे. हिंदीमध्ये अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती करणा-या मिराज क्रिएशन्सची ही पहिलीच मराठी निर्मिती आहे.
‘आय लव्ह यू ऐश्वर्या’ ही एक लव्हस्टोरी असल्याचं शीर्षकावरून अगदी स्पष्टपणे जाणवतं. या लव्हस्टोरीचं आकर्षण म्हणजे यातील नायक हा नायिकेपेक्षा वयानं थोडा लहान आहे, त्यामुळे त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांसोबतच सिनेतज्ज्ञांनाही आकर्षित करणारी ठरणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना आजवर कधीही न अनुभवलेलं वातावरण आणि त्यात अलगदपणे उमलत जाणारी प्रेमकथा पहायला मिळणार असल्याचं दिग्दर्शक जिगर यांचं म्हणणं आहे. दिग्दर्शक जिगर नागदा यांनीच ‘आय लव्ह यू ऐश्वर्या’चं कथालेखन केलं असून पटकथा आणि संवादलेखन नताशा तेंडुलकर यांची आहे. पिकल एंटरटेनमेंट मार्केटिंग आणि वितरणाची जबाबदारी पार पाडणार आहे.
-एम सुंदर