कॅलिडोस्कोप सिनेमा अँड पिक्चर्स प्रॉडक्शन्स आणि एस. आर. एन्टरप्रायजर्सच्या संयुक्त विद्यमाने

कॅलिडोस्कोप सिनेमा अँड पिक्चर्स प्रॉडक्शन्स आणि एस. आर. एन्टरप्रायजर्सच्या संयुक्त विद्यमाने

मराठीत प्रथमच सात मराठी चित्रपटांची घोषणा

आशय, विषय, कथेची मांडणी असो की सादरीकरण आणि उच्चत्तम निर्मितीमुल्यं या सर्वांच्या जोरावर आज मराठी चित्रपट साता समुद्रापार पोहचला आहे. मराठी मनोरंजन विश्व हे अधिकाधिक व्यापक बनत चाललेलं आहे. याचाच परिपाक म्हणून इतर भाषांमधील निर्मातेही मराठी चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात उतरत आहेत. याचीच प्रचिती बुधवारी मुंबईत पार पडलेल्या एका रंगारंग सोहळ्यात आली. हिंदीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांचे लेखन आणि निर्मिती करणा-या परितोष पेंटर यांच्या कॅलिडोस्कोप सिनेमा अँड पिक्चर्स प्रॉडक्शन्स आणि राजेशकुमार मोहंती यांच्या एस. आर एन्टरप्रायजर्स या दोन मोठ्या निर्मितीसंस्थांनी एकत्रितपणे आपल्या आगामी सात नव्या चित्रपटाची घोषणा काल केली. विशेष म्हणजे सातही चित्रपटाचे दिग्दर्शन या क्षेत्रातील मातब्बर दिग्दर्शक मंडळी करणार असून त्यात अनेक कसलेल्या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. मनोज अवाना या चित्रपटांचे सहनिर्माते असून सेजल पेंटर आणि मंगेश रामचंद्र जगताप ऑनलाइन निर्माते आहेत.

या सात चित्रपटांमध्ये ‘निरवधी’, ‘सुटका’, ‘एप्रिल फुल’, ‘फक्त महिलांसाठी’, ‘थ्री चिअर्स’, ‘एकदा येऊन तर बघा’ आणि ‘ती मी नव्हेच’ या सात कलाकृतींची घोषणा करण्यात आली.

‘निरवधी’ चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार असून त्यात सुबोध भावे, उपेंद्र लिमये आणि गौरी इंगवले हे प्रमुख कलाकार बघायला मिळणार आहेत.

‘सुटका’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक करणार असून यात स्वप्निल जोशी, प्रार्थना बेहरे आणि ओंकार राऊत या कलाकारांच्या मुख्य भूमिका बघायला मिळणार आहेत.

‘एप्रिल फुल’ ही एक थ्रिलर कॉमेडी स्वरुपाची फिल्म असून त्याचे दिग्दर्शन प्रियदर्शन जाधव करणार आहे. यात सिद्धार्थ जाधव, अंकित मोहन, रसिका सुनिल आणि रिंकू राजगुरु हे कलाकार मुख्य भूमिकेत असतील.

मृणाल कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या ‘फक्त महिलांसाठी’ या चित्रपटात सई ताम्हणकर, शिवानी रंगोळे, प्रसाद ओक आणि वंदना गुप्ते हे कलाकार बघायला मिळणार आहेत.

‘थ्री चिअर्स’चे लेखन दिग्दर्शन परितोष पेंटर यांचे असणार आहे आणि यात सिद्धार्थ जाधव, श्वेता गुलाटी, जयेश ठक्कर, भरत दाभोळकर, तेजस्विनी लोणारी, रेशम टिपणीस, विजय पाटकर आणि कॉमेडी किंग जॉनी लिव्हर बघायला मिळणार आहेत.

‘एकदा येऊन तर बघा रिटर्न जाणारच नाही’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रसाद खांडेकर यांनी सांभाळली असून या चित्रपटाद्वारे मोठया पडद्यावर दिग्दर्शकीय पदार्पण करतोय. यात सयाजी शिंदे, गिरिश कुलकर्णी, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, नम्रता संभेराव, वनिता खरात, राजेश शिरसाटकर, ओंकार भोजने, गौरव मोरे आणि पंढरीनाथ कांबळे आदी कलाकार बघाला मिळणार आहेत.

परितोष पेंटर यांच्या लेखनीतून उतरलेल्या ‘ती मी नव्हेच’ या चित्रपटात श्रेयस तळपदे, निनिद कामत आणि उर्मिला मातोंडकर हे हिंदी कलाविश्व गाजवणारे कलाकार प्रथमच मराठीमध्ये एकत्र काम करताना दिसणार आहेत.

याप्रसंगी बोलताना कॅलिडोस्कोप सिनेमा अँड पिक्चर्स प्रॉडक्शन्सचे प्रमुख परितोष पेंटर म्हणाले की, मराठी ही माझी मातृभाषा आहे. मी आजवर हिंदीमध्ये अनेक चित्रपट आणि मालिकांचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. हे करत असातानाच मराठीमध्येही काही तरी करावं असा विचार कायम मनात होता. गेल्या काही वर्षांमध्ये मराठी चित्रपटाने जी उंची गाठली आहे ती स्तुत्य आहे. या मराठी चित्रपटसृष्टीचा भाग होत असल्याचा मला आनंद आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या रुंदावलेल्या कक्षा आणखीन मोठया करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आशय विषयाच्या बाबतीत मराठी चित्रपटाने स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे. या सात वेगवेगळया चित्रपटांच्या माध्यमातून निर्मितीचा भक्कम पूल उभारण्याचा आमचा मानस आहे.

तर एस आर एन्टरप्राइजर्सचे राजेशकुमार मोहंती म्हणाले की, मराठी हा आता केवळ प्रादेशिक चित्रपट राहिलेला नाहीये तर त्याने आंतरराष्ट्रीय चित्रपटाचं स्वरुप धारण केलं आहे. मराठीमध्ये कायमच आशयाला महत्त्व दिलं जातं आणि हीच बाब मला या चित्रपटांच्या बाबतीत जास्त आवडते. यामुळेच मराठीमध्ये अशाच आशयघन चित्रपटांची निर्मिती करण्याच्या हेतूनेच आम्ही या सात चित्रपटांच्या निर्मितीचा घाट घातला आहे.

याप्रसंगी बोलताना दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले की, ‘निरवधी’ या चित्रपटाची गोष्ट खूप दिवसांपासून माझ्या डोक्यात होती. ही एक अतिशय सुंदर, नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळी अशी प्रेमकथा आहे. या कथेसाठी पहिल्यापासून माझ्या डोक्यात सुबोध भावे हेच नाव होतं. सुबोधलाही चित्रपटाची गोष्ट खूप आवडली. परितोष पेंटर आणि राजेशकुमार मोहंती यांच्यासारखे निर्मात्यांची साथ मिळाल्यामुळे हा चित्रपट सर्वच बाबतीत दर्जेदार बनेल यात शंकाच नाही.”

दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणाले की “आतापर्यंत दिग्दर्शक म्हणून मी ऐतिहासिक किंवा पिरियड फिल्म्स हेच प्रकार हाताळले होते. मला आजच्या काळातली एक गोष्ट सांगण्याची खूप इच्छा होती. ‘सुटका’च्या माध्यमातून मी तशी गोष्ट सांगू शकणार आहे याचा विशेष आनंद आहे.”

एका मोठ्या कालावधीनंतर मराठीमध्ये पुनरागमन करणा-या उर्मिला मातोंडकरने आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की, “ चित्रपटाची कथा ऐकताच क्षणी मला भावली. यासाठी मी पारितोषला नकार देऊच शकले नसते. ‘ती मी नव्हेच’च्या माध्यमातून पारितोष सोबत काम करण्याचा आनंद तर आहेच शिवाय मराठी चित्रपटाद्वारे आणि श्रेयस तळपदे सारख्या सहकलाकारासोबत काम करायला मिळत असल्याने हा आनंद द्विगुणीत झाला आहे.”.

स्वप्न पाहणारा आणि ती स्वप्न पूर्ण करणाऱ्या पारितोषला ‘झुकेगा नही साला’ ही उक्ती लागू पडते. आणि अशा ध्येयवेडया माणसासोबत पुन्हा काम करायला मिळतंय याचा आनंद श्रेयस ने यावेळी बोलून दाखवला. ‘ती मी नव्हेच’ चित्रपटाच्या निमित्ताने श्रेयस तळपदे बऱ्याच वर्षाने मराठी चित्रपटात दिसणार आहे.

या सातही सिनेमांच्या निर्मितीसाठी मोशन कॉंटेट ग्रुप यांचाही सहयोग लाभणार आहे. ग्रुप एम सारख्या जगभरात नावाजलेल्या आघाडीच्या मीडिया इनव्हेस्टमेंट कंपनीचा भाग असलेली, WPP कंपनीच्या कंटेंट एन्ड आयपी इन्व्हेस्टमेंटचची महत्त्वाची शाखा असलेली मोशन कंटेट ग्रुप ही कंपनी या सर्व चित्रपटांच्या मार्केटिंग आणि मॉनेटाईजेशनची बाजू भक्कमपणे सांभाळणार आहे. या सात चित्रपटांसाठी विपणन भागीदार म्हणून त्यांचे सहकार्य लाभणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोशन कॉंटेंट ग्रुपचा मिळणारा पाठिंबा आणि त्यांची बांधिलकी मराठी चित्रपटाला नक्कीच जागतिक स्तरावर एका वेगळया उंचीवर घेऊन जाईल.

मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलेल्या या रंगारंग सोहळ्याचं खुमासदार सूत्रसंचालन अभिनेता सुव्रत जोशी याने केलं.

 

By Sunder M