कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर ‘संगीत देवबाभळी’ निरोप घेणार

कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर ‘संगीत देवबाभळी’ निरोप घेणार

श्री षण्मुखानंद सभागृह येथे होणार शेवटचा प्रयोग

सहा वर्षापूर्वी सुरु झालेले,५००व्या प्रयोगाने  प्रवास आता विसावणार

ऐसा लाभा जो चुकला | तुका म्हणे वाया गेला

‘भद्रकाली’ प्रॉडक्शन वर प्रेम करणार्‍या सर्व माय बाप रसिकांना राम कृष्ण हरी…

२२ डिसेंबर २०१७ यादिवशी ‘भद्रकाली’ प्रॉडक्शन’ च्या ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाचा शुभारंभ झाला. सहा वर्षांपूर्वी सुरू झालेला प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे. विठुरायाच्या आशीर्वादाने आणि आपल्या प्रेम प्रतिसादाने भारावलेली ही ‘संगीत देवबाभळी’ ची नाट्य दिंडी विसावणार आहे.बुधवार, २२ नोव्हेंबर, संध्याकाळी ६.३० वाजता श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह, सायन, मुंबई येथे शेवटचा प्रयोग संपन्न होणार आहे.

हा सहा वर्षांचा प्रवास इतका सहज आणि सोपा नव्हता. एक नवा विषय, नवीन लेखक, नवे कलाकार घेऊन व्यावसायिक रंगभूमीवर येणे तसे अवघड होते. परंतु भद्रकालीने हा प्रयोग केला आणि आपल्या साथीने तो यशस्वही झाला. मध्ये करोना सारखं भयाण संकट येऊन गेलं पण त्यानंतरही आपलं प्रेम कमी झालं नाही, ते चंद्रभागेसारखं वाहतच राहिलं.

याच प्रेमामुळे या नाटकाने सर्वाधिक ४४ पुरस्कार प्राप्त केले आणि लाखो रसिकांसह अनेक दिग्गजांच्या मनाला भुरळ घातली. मजल दरमजल करत अवघा महाराष्ट्र विठुमय करणारी ही ‘देवबाभळी’ आता ५०० व्या प्रयोगापर्यंत येऊन पोहोचली आहे.

खरं तर मायबाप रसिकांचा आग्रह आहे की, नाटक बंद करू नका मात्र कुठेतरी थांबणं हे गरजेचं असतं, म्हणून ही वारी ५०० व्या प्रयोगापर्यंत नेवून आपण थांबणार आहोत. महाराष्ट्रातला हा शेवटचा प्रयोग २२ नोव्हेंबर २०२३ रोजी सायन येथील श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह येथे मोठ्या दिमाखात सादर होत आहे.

अनेकांनी हा प्रयोग अजूनही पाहिलेला नाही तर काहींनी या प्रयोगाची पारायणं केली आहेत. अशा सर्व मायबाप रसिकांसाठी ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक पाहण्याची ही शेवटची संधी आहे. तेव्हा कार्तिकी एकादशीच्या पूर्वसंध्येला या विठू सावळ्या नाट्यकृतीसह हरीमय होण्यासाठी अवघे अवघे या!!!!

ऐसा कार्तिकीचा सोहळा । चला जाऊ पाहू डोळा ।

By Sunder M