“कासरा” येतोय २४ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला!
“कासरा” येतोय २४ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला!
बळीराजाच्या संघर्षाची गोष्ट सांगणाऱ्या कासरा चित्रपटाच्या टीजरला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे चित्रपटाविषयी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता या चित्रपटातलं घराला घरपण हे गाणं लाँच करण्यात आलं. शेतकरी कुटुंबातल्या संतुष्ट आयुष्याचं चित्रण या गाण्यात करण्यात आलं असून, कासरा हा चित्रपट २४ मे रोजी प्रदर्शित होत आहे.
रवी नागपूरे यांच्या साई उत्सव फिल्म्स या निर्मिती संस्थेनं कासरा चित्रपटाची निर्मिती केली आहे. विकास विलास मिसाळ यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. रवी नागपूरे यांच्याच कथेवर महेंद्र पाटील यांनी पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. अविनाश सातोसकर यांनी छायांकन, प्रशांत नाकती, संकेत गुरव यांनी संगीत दिग्दर्शन, प्रशांत नाकती यांनी गीतलेखन केलं आहे. चित्रपटात स्मिता तांबे, गणेश यादव, जनमेजय तेलंग, तन्वी सावंत, राम पवार, प्रकाश धोत्रे, डॉ. वंदना पटेल, कुणाल सुमन, साई नागपूरे, देवेंद्र लुटे, विशाल अर्जून यांच्या भूमिका आहेत.
‘घराला घरपण’ हे गाणं सोनाली सोनावणे आणि रवींद्र खोमणे यांनी गायलं आहे. समाधानी, संतुष्ट असलेल्या शेतकरी कुटुंबाचं चित्रण या गाण्यात पाहायला मिळतं. अतिशय अर्थपूर्ण शब्द, श्रवणीय संगीत, गायकांचा भावपूर्ण आवाज आणि उत्तम चित्रीकरण यांचा मिलाफ या गाण्यात झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या घराचं प्रतिबिंब पाहिल्याची भावना हे गाणं देत. शेतकरी कुटुंबाची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आल्याने या चित्रपटाविषयी चित्रपटसृष्टीत चर्चा आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी आता केवळ २४ मे पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे
By Sunder M