नव्या-जुन्या कलाकारांचा सुरेख मेळ लेक असावी तर अशी
*नव्या-जुन्या कलाकारांचा सुरेख मेळ लेक असावी तर अशी*
मोठमोठ्या कलाकारांना एकत्र घेऊन चांगल्या दर्जाचा सिनेमा बनवणं हे निर्माता दिग्दर्शकांसाठी मोठं आव्हान असतं. काही निर्माता-दिग्दर्शकांना मात्र हे कसब चांगलंच अवगत असतं. ‘लेक असावी तर अशी’ हा आगामी मराठी चित्रपटही याला अपवाद नाही. ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक विजय कोंडके यांनी नव्या-जुन्या कलाकारांचा सुरेख मेळ ‘लेक असावी तर अशी’ या चित्रपटाच्या निमित्ताने घातला आहे. या चित्रपटात नयना आपटे, सविता मालपेकर, शुभांगी गोखले, यतीन कार्यकर, अभिजीत चव्हाण, प्राजक्ता हनमघर, ओंकार भोजने, कमलेश सावंत, सुरेखा कुडची या लोकप्रिय कलाकारांच्या भूमिका आहेत. सोबत गार्गी दातार हा नवा चेहरा झळकणार आहे. ‘ज्योती पिक्चर्स’ निर्मित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेन्टची प्रस्तुती असलेला ‘लेक असावी तर अशी’ हा मराठी चित्रपट २६ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय.
‘लेक असावी तर अशी’ या चित्रपटातून दिग्गजांचं एकत्र येणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. यातील प्रत्येक कलाकाराची आपली एक खासियत आहे. विनोदी भूमिका ताकदीने साकारण्याचं कौशल्य नयना आपटे,अभिजीत चव्हाण, प्राजक्ता हनमघर, ओंकार भोजने यांच्या ठायी आहे. छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आबालवृद्धांना आपल्या अभिनयशैलीने मोहिनी घालण्याचं कसब सविता मालपेकर, शुभांगी गोखले, यतीन कार्यकर यांच्याकडे आहे. मराठी रंगभूमीपासून हिंदीपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेता कमलेश सावंत, विनोदी भूमिकांसोबतच धीरगंभीर भूमिकाही तितक्याच ताकदीने साकारणाऱ्या सुरेखा कुडची, अशा सर्व दिग्गजांना एकाच फ्रेममध्ये आणण्याचं काम दिग्दर्शक विजय कोंडके यांनी ‘लेक असावी तर अशी’ या कौटुंबिक कलाकृतीच्या माध्यमातून केलं आहे. ३४ वर्षांपूर्वी मराठी चित्रपटात इतिहास घडविणाऱ्या ‘माहेरची साडी’च्या अभूतपूर्व यशानंतर विजय कोंडके यांच्या ‘लेक असावी तर अशी’ या चित्रपटाकडून रसिकांच्या भरपूर अपेक्षा आहेत.
प्रेमाचा आणि नात्याचा अनुबंध उलगडणारा ‘लेक असावी तर अशी’ चित्रपट २६ एप्रिलला प्रदर्शित होत आहे.