उत्सुकता वाढवणारा ‘गूगल आई’चा ट्रेलर प्रदर्शित
उत्सुकता वाढवणारा ‘गूगल आई’चा ट्रेलर प्रदर्शित
शोध… भीती… काळजी… वेदना… अशा भावनांच्या विविध छटा उलगडणाऱ्या ‘गूगल आई’चा रोमांचक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून ट्रेलर पाहून ‘गूगल आई’मध्ये काय रहस्य दडलेय, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच ‘गूगल आई’ बद्दल जाणून घेण्याची प्रेक्षकांची इच्छा होती. त्यात आता या उत्कंठावर्धक ट्रेलरने प्रेक्षक ‘गूगल आई’ची आतुरतेने वाट पाहात आहेत.
विविध भावनिक छटा उलगडणारा ‘गूगल आई’ चित्रपटाचा रंजक, रोमांचक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. डॉलर्स मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि गेहिनी रेड्डी प्रस्तुत ‘गूगल आई’ या चित्रपटाचे डॉलर दिवाकर रेड्डी निर्माते आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, लेखन आणि दिग्दर्शन गोविंद वराह यांचे आहे. तर ‘गूगल आय’ला एस सागर यांचे संगीत लाभले आहे. प्रणव रावराणे, प्राजक्ता गायकवाड, अश्विनी कुलकर्णी, माधव अभ्यंकर यांच्या प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट येत्या २६ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
ट्रेलरमध्ये एक हसतेखेळते, आनंदी कुटुंब दिसत असून अचानक त्यांच्या या सुखी कुटुंबात एक वादळ येते. या वादळात संपूर्ण कुटुंबाची वाताहत झाल्याचे दिसत आहे. आता त्यांच्या आयुष्यात हे वादळ कसे आले, त्यातून ते बाहेर पडणार का? यात ‘गूगल आई’ची कशी मदत होणार, या सगळ्या प्रश्नांची प्रेक्षकांना चित्रपट पाहून मिळणार आहेत. दरम्यान या चित्रपटाचे दिग्दर्शन साऊथच्या दिग्दर्शकांनी केल्यामुळे यात साऊथचा तडकाही पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ‘गूगल आई’च्या निमित्ताने मराठी चित्रपट एका वेगळ्या वळणावर गेल्याचे चित्र आहे.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक गोविंद वराह म्हणतात, ” मराठी सिनेसृष्टीबद्दल मला कायमच आकर्षण राहिले आहे. त्यामुळे मराठीत एखादी तरी कलाकृती करावी, असे मनात होतेच आणि माझी ही इच्छा ‘गूगल आई’च्या निमित्ताने पूर्ण झाली. खरं तर साऊथ आणि मराठीची काम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. परंतु या सगळ्याच कलाकारांनी मला खूप सहकार्य केले. यात या चिमुरडीचे विशेष कौतुक करावे लागेल. तिनेही यात कमाल अभिनय केला आहे. चित्रपटाची संपूर्ण कथा तिच्याभोवती फिरणारी आहे. ‘गूगल आई’ला थोडा साऊथ टचही देण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना पाहातानाही एक वेगळा अनुभव येईल. तंत्रज्ञानाचा फायदाही आहे, नुकसानही आहे. त्याचा वापर कसा केला जातो, हे महत्वाचे आहे. हेच सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. थरार, रहस्यांनी भरलेला हा चित्रपट कौटुंबिक असून संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा आहे.
By Sunder M