EntertainmentMarathi

‘आर्यन्स नवदुर्गा सन्मान पुरस्कार’ आणि ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२४’ नामांकन सोहळा

‘आर्यन्स नवदुर्गा सन्मान पुरस्कार’ आणि ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२४’ नामांकन सोहळा

राज्य सरकारनंतर रोख पुरस्कार देणारा दुसरा पुरस्कार सोहळा असा मनोरंजन विश्वात नावलौकीक मिळवलेल्या ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२४’ पुरस्कार सोहळ्याची नामांकने लवकरच घोषित होणार आहेत. याच सोहळ्यात ‘आर्यन्स नवदुर्गा सन्मान पुरस्कार’ वितरीत करण्यात येणार आहेत. ‘मराठी कलांचा, गुणांचा प्रतिभा प्रशंसा सोहळा…’ अशी बिरुदावली मिरवणारा ‘आर्यन्स सन्मान’ पुरस्कार सोहळा घोषणेपासूनच मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय ठरला होता. बुधवार २७ नोव्हेंबर रोजी या पुरस्कार सोहळ्याची नामांकने घोषित केली जाणार आहेत. दुसऱ्या वर्षात पदार्पण केलेला ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२४’ नामांकन सोहळा यंदा बुधवार २७ नोव्हेंबर रोजी केशव बाग, डी. पी. रोड, कर्वे नगर, पुणे येथे सायंकाळी ६.३० वाजता भव्य-दिव्य स्वरूपात पार पडणार आहे. ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२४’ पुरस्कार सोहळ्यामध्ये एकूण २३ विभागांमध्ये मराठी चित्रपटांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. नाट्य विभागात १६ पुरस्कार दिले जाणार आहेत. पुरस्कारांची एकूण रक्कम १३ लाख रुपये असून ही रक्कम ओमा फाऊंडेशन कडून वितरित करण्यात येणार आहे. दिनांक १ जून २०२३ ते दिनांक ३१ मे २०२४ या कालावधीत प्रदर्शित किंवा सेन्सॉर झालेल्या मराठी व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांना तसेच चित्रपटांना पुरस्कार सोहळ्यात प्रवेश देण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्याची नामांकने उत्सुकता वाढवणारी ठरणार आहेत.

याच सोहळ्यात आपल्या असामान्य अशा कर्तृत्वाच्या बळावर समाजाला नवी दिशा देण्याचे काम करणाऱ्या नवदुर्गांचा ‘आर्यन्स नवदुर्गा सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. ‘आर्यन्स नवदुर्गा सन्मान पुरस्कारा’चे स्वरूप रुपये २१००० रोख आणि सन्मान चिन्ह असे असून ही रक्कम ओमा फाऊंडेशन कडून वितरित करण्यात येणार आहे. यासाठी मोटिवेशनल आरती बनसोडे, रेस्क्यूटीमच्या सायली पिलाणे, समाज सेविका (प्रेरणेचे माहेर) सिस्टर लूसी कुरियन, चित्रकार पूजा धुरी, शेतकरी ताराबाई पवार, सहेली संस्थेच्या समाजसेविका तेजस्वी सेवेकरी, ममता चॅरिटेबल ट्रस्टच्या समाजसेविका ज्योती सचदा, नेमबाज अदिती गोपीचंद स्वामी, समाजसेविका अहिल्याबाई बर्डे या नवदुर्गांची निवड करण्यात आली आहे. या नवदुर्गांच्या कार्यावर एक नजर टाकताना त्यांच्या कर्तृत्त्वाची उंची अगदी सहज लक्षात येते. मुंबईतील आरती बनसोडे शिक्षकेची नोकरी सोडून शिक्षणापासून भरकटलेल्या विद्यार्थी आणि पालकांना शिक्षणाबाबत मोफत मोटिवेशन करतात. पुण्यातील सायली पिलाणे जंगलातील जखमी प्राण्यांना रेस्क्यू करून त्यांच्यावर उपचार करतात. पुण्यातीलच सिस्टर लूसी कुरियन पाच वेळा जागतिक प्रेरणादायी व्यक्ती ठरल्या आहेत. सिंधुदुर्गमधील पूजा धुरी या चित्रकलेत महाराष्ट्रातून पहिल्या आल्या असून त्या स्वतः आणि त्यांचे आई-वडील हे दोघे कर्णबधीर आहेत, त्या स्वतः रेखाटलेल्या चित्रांची विक्री करतात. कोपरगाव अहमदनगरमधील ताराबाई पवार यांनी नदीमध्ये बुडणाऱ्या तीन मुलांच्या दिशेने स्वतःची साडी काढून फेकली आणि दोघांचे प्राण वाचवले. पुण्यातील तेजस्वी सेवेकरी या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना त्या व्यवसायातून बाहेर काढून चांगल्या ठिकाणी नोकरी लावून देतात तसेच त्यांचे मागदर्शन करतात. पुण्यातील ज्योती सचदा या कपडे, अन्नधान्य, खेळणी तसेच इतर उपयोगी वस्तू गोळा करून अनाथाश्रम, महिलाश्रम, वृद्धाश्रम तसेच गोरगरिबांना वाटप करतात. साताऱ्यातील अदिती गोपीचंद स्वामी या महाराष्ट्रातील एक नेमबाज आहेत. २०२३ मध्ये जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कंपाऊंड तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून त्या वरिष्ठ पातळीवरील तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय तिरंदाज ठरल्या आहेत. २०२३ मध्ये जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेत त्यांनी वैयक्तिक आणि सांघिक सुवर्ण पदक मिळवले. अहमदनगरमधील नेवासा येथील अहिल्याबाई बर्डे यांनी नदीपात्रातून १०० पेक्षा जास्त मृतदेह बाहेर काढण्याचे काम केले असून, मागील ३० वर्षांपासून त्या आत्महत्या करणाऱ्यांना नदीपात्रातून वाचवण्याचे काम करत आहेत. या नवदुर्गांना पुरस्कृत करून त्यांच्या कार्याला सलाम करण्याचे काम ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२४’ च्या नामांकन सोहळ्यात केले जाणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने पुण्यामध्ये मराठी नाटक-चित्रपट क्षेत्रातील कलाकार-तंत्रज्ञांची मांदियाळी अवतरणार आहे.

‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२४’ अंतिम पुरस्कार सोहळा हा गणेश कला क्रीडा मंच, पुणे येथे होणार असून लवकरच याची तारीख घोषित करण्यात येणार आहे. पुण्यामधून आर्यन्स ग्रुप लवकरच मराठी वृत्तवाहिनी, मनोरंजन वाहिनी, क्रीडा वाहिनी आणि ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे मिडीया आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात पदार्पण करीत आहे. यामुळे पुणे परिसरातील कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते यांनाही आर्यन्स परिवारात सामावून घेता येणार आहे..

 

 

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *