ऍक्शनपॅक्ड “राजवीर” चित्रपटाचा ट्रेलर लाँच
ऍक्शनपॅक्ड “राजवीर” चित्रपटाचा ट्रेलर लाँच
सुहास खामकरची प्रमुख भूमिका
साकार राऊत दिग्दर्शित “राजवीर”
पोलिस अधिकाऱ्यानं एखादं ध्येय निश्चित केलं असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो.
अशाच एका ध्येयानं प्रेरित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची रंजक गोष्ट ‘राजवीर’ या चित्रपटातून उलगडणार आहे. अॅक्शनपॅक्ड या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे.
अर्थ स्टुडिओ यांनी सारा मोशन पिक्चर्स आणि रुचिका तोलानी प्रॉडक्शन्स, समृद्धी मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने राजवीर चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. साकार प्रकाश राऊत, ध्वनि साकार राऊत, गौरव परदासनी, सूर्यकांत बाजी चित्रपटाचे निर्माते, तर रुचिका तोलानी सूचक सहनिर्मात्या आहेत. साकार राऊत, स्वप्नील देशमुख यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखन साकार राऊत, जेकॉब आणि पॉल कुरियन, माज खान यांनी केलं आहे. भूषण वेदपाठक यांनी छायांकन, अभिनंदन गायकवाड, होपून सैकिया यांनी संगीत दिग्दर्शन, साकार राऊत, कश्यप कुलकर्णी यांनी संकलन केलं आहे. चित्रपटात सुहास खामकरसह झाकीर हुसैन, गौरव परदासनी, प्राशी अवस्थी, धीरज सानप यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
ड्र्ग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला असल्यानं राजवीर हा आयपीएस अधिकारी ड्रग्जचं रॅकेट उद्ध्वस्त करण्याचा निश्चय करतो. त्याच्या या ध्येयामध्ये अनेक अडथळे, आव्हाने, संकटे येतात. या संकटांना तोंड देत तो त्याचं ध्येय साध्य करतो का, या आशयसूत्रावर राजवीर हा चित्रपट बेतला आहे. अत्यंत तडफदार व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरनं राजवीर ही आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. बॉडीबिल्डर असलेला सुहास खामकर या चित्रपटात धडाकेबाज अॅक्शन सिक्वेन्स करताना ट्रेलरमध्ये दिसून येतो. म्हणूनच राजवीर मोठ्या पडद्यावर चित्रपटगृहात जाऊन पाहायला हवा.
By Sunder M