या जीवनगौरव पुरस्काराचा आनंद वेगळाच – पुरुषोत्तम बेर्डे
या जीवनगौरव पुरस्काराचा आनंद वेगळाच – पुरुषोत्तम बेर्डे
विठ्ठल उमप फाऊंडेशनच्या ‘मृद्गंध पुरस्कार’ वितरणा प्रसंगी केले प्रतिपादन
‘माझ्या कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवी टप्प्यावर हा पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे.’ कार्यरत असताना मिळालेला हा जीवनगौरव अजून चांगले काम करायला बळ देणारा असल्याचं प्रतिपादन लेखक-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी विठ्ठल उमप फाऊंडेशनच्या प्रतिष्ठेच्या ‘मृद्गंध पुरस्कार’ वितरण प्रसंगी केले. ‘खंडोबाचं लगीन’ या नाटकादरम्यान लोकशाहीर विठ्ठल उमप यांची ओळख झाली आणि आज त्या नाटकातील काही मंडळीच्या साक्षीने हा पुरस्कार मिळतोय हा वेगळा आनंद सुद्धा आहे. अतिशय दृष्ट लागण्यासारखा हा सोहळा आयोजित केल्याबद्दल नंदेश उमप आणि सरिता उमप यांचे मनापासून कौतुक करत पुरुषोत्तम बेर्डे यांनी या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
आपली लोकसंगीताच्या अनुभवाची शिदोरी वेगवेगळ्या कार्यक्रमांतून सादर करत महाराष्ट्र शिरोमणी शाहीर विठ्ठल उमप यांनी लोककलेची परंपरा जपत समाजप्रबोधनासह जनजागृतीचा प्रयत्न सातत्याने केला. आपले अवघे आयुष्य लोककलेसाठी समर्पित करणाऱ्या संगीत नाटक अकादमी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘मृद्गंध पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते. नुकताच १४ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृद्गंध पुरस्कार’ सोहळा ठाणे येथील काशिनाथ घाणेकर सभागृहात रंगला. इतर मृदगंध पुरस्कार विजेत्यांमध्ये श्रीमती सुरेखा पुणेकर (लोककला), श्रीगौरी सुरेश सावंत ( सामाजिक क्षेत्र), श्री. आदेश बांदेकर (अभिनय व सूत्रसंचालन), श्रीमती सुचित्रा बांदेकर (अभिनेत्री आणि निर्माती), श्री रोहित राऊत (नवोन्मेष प्रतिभा-संगीत क्षेत्र), श्रीमती दीपाली देशपांडे (क्रीडा क्षेत्र) आणि श्री. ज्ञानेश महाराव (लेखक व पत्रकार ) यांना ‘मृद्गंध पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना पुरस्कार विजेत्यांनी महाराष्ट्र शिरोमणी शाहीर विठ्ठल उमप यांच्या आठवणींना उजाळा देत पुरस्काराविषयी कृतज्ञता व्यक्त केली. अभिनेते आदेश बांदेकर म्हणाले की, ‘कलेच्या प्रवासात अनेक आश्वासक हात पाठीवर पडले त्यातला एक हात शाहीर विठ्ठल उमप यांचा होता हा पुरस्कार नाही तर आशीर्वाद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.’ शाहीर विठ्ठल उमप यांनी आदेशला आपल्या मुलाप्रमाणे मदत केली आहे. त्यामुळे सासऱ्यांच्या नावाचा हा पुरस्कार स्वीकारणे माझ्यासाठी भाग्याचे असल्याचे अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी सांगितले. या पुरस्काराने नवं, चांगलं काम करण्याची प्रेरणा तर मिळाली पण जबाबदारी सुद्धा वाढल्याची कबुली गायक रोहित राऊत यांनी दिली. मातीचा गंध असणारा हा पुरस्कार माझी महाराष्ट्राशी असणारी वीण आणखी घट्ट करणार असल्याचे प्रतिपादान क्रीडापटू दीपाली देशपांडे यांनी केले. माझ्या मातीतील हा पुरस्कार असून शाहीर विठ्ठल उमप यांचे आशीर्वाद माझ्यासोबत असल्याचे मत श्रीगौरी सुरेश सावंत यांनी व्यक्त केले. या पुरस्कारामुळे धन्य झाल्याची भावना लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी बोलून दाखविली. हा पुरस्कार माझा स्वाभिमान वाढवणारा आहे, असं लेखक व पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी सांगितले.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या अभिनेत्री रोहिणी हटट्गंडी म्हणाल्या की, ‘ज्यांनी आपल्या कलेतून रसिकांना आनंद दिला त्यांची आठवण आज त्यांची मुलं ठेवतायेत हे खरंच खूप कौतुकास्पद आहे.’ जयराज साळगावकर (संपादक, कालनिर्णय), श्री. संदिप माळवी (अतिरिक्त आयुक्त, ठाणे) आदी मान्यवर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते ‘मृद्गंध पुरस्कार’ देण्यात आले. शाल,पुष्प पुस्तक, मानपत्र व विठ्ठल उमपांची प्रतिकृती असलेले मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी दत्ता भाटकर, गणेश धाडसे, अमृत कांबळे, पुंडलिक सानप, अनिल आरोसकार या रंगमंच कामगारांना अर्थसहाय्य देण्यात आले.a
यावेळी श्री तौफिक कुरेशी (झेंबे वादक) आणि ग्रुप पं.श्री विजय चव्हाण व ग्रुप (महाराष्ट्राची वाद्य) यांच्या सुमधुर संगीताची मेजवानी तसेच श्रीमती सितारादेवी व नटराज गोपीकृष्ण यांचे वंशज असलेले श्री विशाल कृष्णा यांच्या कथ्थक नृत्याचा आस्वाद रसिकांनी घेतला. या बहारदार कार्यक्रमाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
By Sunder M