Entertainment

55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची दिमाखात सुरुवात – महोत्सवाचे संचालक शेखर कपूर

55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची दिमाखात सुरुवात – महोत्सवाचे संचालक शेखर कपूर

इफ्फी 2024 च्या उद्घाटन समारंभात भारतीय चित्रपटसृष्टीतील चार दिग्गज – राज कपूर, तपन सिन्हा, अक्किनेनी नागेश्वर राव आणि मोहम्मद रफी यांच्यावरील विशेष तिकिटाचे अनावरण – चित्रपट उद्योगातील बहुप्रशंसित व्यक्तिमत्त्व आणि उत्साही सिने-रसिकांच्या उपस्थितीत, गोव्याच्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी 55 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी ) चा प्रारंभ झाल्याचे घोषित करण्यात आले. भारताचा सांस्कृतिक समन्वय आणि विविधतेचे दर्शन घडवणाऱ्या बहुरंगी सांस्कृतिक कार्यक्रमांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले आणि सर्जनशीलता, सिनेमॅटिक प्रतिभा आणि चलचित्रपटांच्या माध्यमातून कथाकथनाची कला साजरी करण्याच्या नऊ दिवसांच्या महोत्सवाची दिमाखात सुरुवात झाली.जगभरातील चित्रपटप्रेमींची प्रदीर्घ प्रतीक्षेची, 55 व्या इफ्फीच्या सुरुवात ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते मायकेल ग्रेसी यांच्या ‘बेटर मॅन’ या चित्रपटाने सांगता झाली.

(छाया : रमाकांत मुंडे )

सिनेप्रेमींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या भव्य उद्घाटन समारंभात सिनेविश्वातील काही दिग्गजांचा सत्कार करण्यात आला . या सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिषेक बॅनर्जी आणि भूमी पेडणेकर या लोकप्रिय कलाकारांनी केले. चित्रपट क्षेत्रातील दिग्गज सुभाष घई, चिदानंद नाईक, बोमन इराणी, आर के सेल्वामणी, जयदीप अहलावत, जयम रवी, ईशारी गणेश, आर. सरथ कुमार, प्रणिता सुभाष, जॅकी भगनानी, रकुल प्रीत सिंग, रणदीप हुडा आणि नित्या मेनन यांना चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल गौरवण्यात आले.
भारतीय परंपरेनुसार, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते नारळाच्या रोपाला पाणी घालून चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले; यावेळी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे; माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू; महोत्सवाचे संचालक शेखर कपूर; सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून जोशी; आणि प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
“निर्मात्यांच्या अर्थव्यवस्थेला आकार देण्यात भारत मोठी भूमिका बजावू शकतो.” भारतीय चित्रपट उद्योगाच्या विकासात इफ्फी हा एक महत्वाचा टप्पा ठरल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटले आहे. ते म्हणाले की, आशय संपन्न सामुग्री निर्माण करणाऱ्यांची अर्थव्यवस्था विकसित करण्यावर अधिक भर दिला जात आहे, कारण ती गतिशील असून झपाट्याने वाढत आहे.
“भारताची वैविध्यपूर्ण संस्कृती, पाककृती, समृद्ध वारसा, आणि भारतीय साहित्य आणि भाषांचा अनमोल खजिना आकर्षक आणि सृजनशीलतेने सादर करणारी नवोन्मेशी सामुग्री घेऊन अनेक जण पुढे येत आहेत,” असे त्यांनी नमूद केले. तंत्रज्ञान आणि क्युरेटर्सची मजबूत परिसंस्था यांचा मेळ साधत, निर्मात्यांच्या अर्थव्यवस्थेला आकार देण्यात भारत महत्वाची भूमिका बजावू शकेल असे ते म्हणाले.
इफ्फी (IFFI) च्या माध्यमातून नवीन भागीदारी आणि नव्या कल्पना उदयाला येतील, तसेच नव्या उपक्रमांच्या माध्यमातून काही तरुण निर्मात्यांना मार्गदर्शन मिळेल, अशी आशा वैष्णव यांनी व्यक्त केली. “या कार्यक्रमादरम्यान मांडल्या गेलेल्या कल्पना येत्या काही वर्षांमध्ये या उद्योगाची दिशा ठरवण्यात उपयोगी ठरतील”, असे ते म्हणाले.
“इफ्फी (IFFI) भारतीय सिनेमाचा प्रसार करण्याचा प्रयत्न करतो.” एका व्हिडिओ संदेशाद्वारे केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन म्हणाले की, हा चित्रपट महोत्सव भारतीय चित्रपटांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी विविध उपक्रम हाती घेतो. चित्रपट-पायरसीला आळा घालण्यासाठी भारत सरकार चित्रपट उद्योगाला पाठबळ देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याशिवाय, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपट सुविधा कार्यालयाची सिंगल-विंडो सिस्टीम सुरु केल्यामुळे चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मंजुरी मिळवणे सुलभ झाले आहे. विविध अनुदानांबरोबरच या उपक्रमामुळे चित्रपट निर्मात्यांसाठी व्यवसाय सुलभता वाढली आहे. डॉ. मुरुगन यांनी इफ्फी (IFFI ) मध्ये सुरू करण्यात आलेल्या क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो (CMOT), या उपक्रमाचा उल्लेख केला, ज्यामध्ये शंभर सृजनशील चित्रपट निर्मात्यांना चित्रपट क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींचे मार्गदर्शन मिळवण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळेल.
जगातील सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या इफ्फी (IFFI) मध्ये सहभागी होण्यासाठी 1000 हून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्याचे ते म्हणाले. प्रख्यात ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते फिलिप नॉयस यांना यंदाचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना इफ्फी (IFFI) ला गौरव वाटत असल्याचे डॉ. एल. मुरुगन यांनी सांगितले.

 

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *