EntertainmentMarathi

ऑस्करच्या शर्यतीत ‘अनुजा’

उत्तम टीमचा भाग होता आल्याचा आनंद – अभिनेते नागेश भोसले

ऑस्करच्या शर्यतीत ‘अनुजा’

ऑस्कर २०२५ ची सध्या चांगलीच चर्चा आहे. ऑस्कर २०२५ सोहळा पुढील वर्षी थाटामाटात संपन्न होणार आहे. भारताचे प्रतिनिधित्व करत इथल्या संस्कृतीशी नाळ जोडणाऱ्या ‘अनुजा’ या भारतीय लघुपटानेही यंदाच्या ऑस्करच्या लघुपट श्रेणीत स्थान मिळवले आहे. ‘लाइव्ह-अ‍ॅक्शन’ शॉर्ट फिल्ममध्ये ‘अनुजा’ १८० शॉर्ट फिल्मसमधून निवडण्यात आली आहे. ‘अनुजा’ची निर्मिती सुचित्रा मटाई यांची असून गुनीत मोंगा या लघुपटाच्या कार्यकारी निर्मात्या आहेत. हा लघुपट वस्त्रोद्योगातील बालमजुरीच्या समस्येवर आधारित आहे. एडम.जे.ग्रेव्स लिखित, दिग्दर्शित या लघुपटामध्ये मराठी अभिनेते नागेश भोसले तसेच सजदा पठाण, अनन्या शानभाग, गुलशन वालिया, सुशील परवाना, सुनीता भादुरीया, जुगल किशोर, पंकज गुप्ता, रोडॉल्फो राजीव हुर्बेट सारख्या कलाकारांनी अभिनय केला आहे. ‘अनुजा’ची कथा एका भारतीय मुलीवर आधारित असून इंडो-अमेरिकन प्रोडक्शन अंतर्गत त्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. ऑस्करच्या लघुपट श्रेणीत ‘अनुजा’ लघुपटाला स्थान मिळाल्याबद्दल अभिनेते नागेश भोसले यांनी आनंद व्यक्त केला आहे.

याबद्दल बोलताना नागेश भोसले सांगतात की, ‘ऑस्कर सारख्या मानाच्या सोहळ्यात आपला लघुपट असणे ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. बालमजुरी सारखा सामाजिक प्रश्न या लघुपटातून अत्यंत प्रभावीपणे मांडला असून एका उत्तम टीमचा भाग होता आल्याचा आनंद निश्चित आहे’.

९७ व्या ऑस्कर पुरस्कार-२०२५ च्या पुरस्कारासाठीची नामांकने १७ जानेवारीला जाहीर होणार आहेत. ऑस्कर पुरस्कार सोहळा २ मार्च रोजी होणार आहे. यामध्ये विजेते घोषित केले जातील. त्यात ‘वस्त्रोद्योगातील बालमजुरीच्या समस्येवर भाष्य करणारा ‘अनुजा’ लघुपट बाजी मारतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *