२१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा सांगता सोहळा
कलेचा आनंद घेता येणे महत्त्वाचे – डॉ. विनय सहस्त्रबुद्धे
२१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा सांगता सोहळा
गेला आठवडाभर रंगलेल्या २१व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा सांगता सोहळा मुव्ही मॅक्स चित्रपटगृहात नुकताच संपन्न झाला. यंदाच्या आशियाई चित्रपट महोत्सवात वैविध्यपूर्ण चित्रपटांची मेजवानी देत रसिकांना आशियाई चित्रपट संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. सुमारे ६० चित्रपटांचा आस्वाद रसिकांना यात घेता आला. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करताना महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांनी महोत्सवासाठी सहकार्य लाभलेल्या सर्वांचे आभार मानले आणि मिळालेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला. अनेकांच्या प्रयत्नांनी, सहकार्याने हा महोत्सव यशस्वी झाला असून महोत्सवाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल फेस्टिव्हल डिरेक्टर संतोष पाठारे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी ज्येष्ठ नेते डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, महोत्सवाचे कार्यकारिणी सदस्य श्रीकांत बोजेवार, चैतन्य शांताराम, संतोष पाठारे, संदीप मांजरेकर, पत्रकार सुनील नांदगावकर आदि मान्यवर मंडळी उपस्थित होती.
यंदाचा सत्यजित राय स्मृती पुरस्कार ज्येष्ठ सिनेपत्रकार रफिक बगदादी यांना तर राष्ट्रीय पारितोषिक विजेते लेखक, प्राध्यापक अनिल झणकर यांना सुधीर नांदगावकर स्मृतीप्रित्यर्थ चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार देण्यात आला. ज्येष्ठ नेते डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, पत्रकार सुनील नांदगावकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या महोत्सवाचे संकल्पनाकार सिने अभ्यासक सुधीर नांदगावकर यांनी मला चित्रपट कसा पहावा व त्याचा आनंद कशा रीतीने घ्यावा हे शिकवले. चित्रपटांचा आनंद घेणे हि एक कला आहे. कला जाणीवपूर्वक जोपासता आली पाहिजे त्यासाठी याचा अभ्यासक्रमात समावेश होण्याची आवश्यकता असल्याचे ज्येष्ठ नेते डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.
आपल्याला चित्रपटांचा फार मोठा इतिहास आहे हा योग्यरीत्या जतन करत उत्तम चित्रपटांचा समावेश अभ्यासक्रमात करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होणे गरजेचं असल्याचं मत प्राध्यापक अनिल झणकर यांनी यावेळी मांडलं. सिनेपत्रकार रफिक बगदादी म्हणाले कि,’आपल्याकडे चित्रपटांशी संबंधित गोष्टींचा खूप मोठा खजिना असताना त्याबद्दल फार कमी बोललं जातं किंवा चित्रपटाकडे अभ्यासपूर्वक नजरेने पाहण्याचा दृष्टिकोन आपण जाणीवपूर्वक निर्माण केला पाहिजे.
काही कारणामुळे उपस्थित राहू न शकलेले महोत्सवाचे प्रमुख पाहुणे सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी आपल्या शुभेच्छा या महोत्सवाला दिल्या.
यंदाच्या चित्रपट स्पर्धा विभागात नव्या दमाच्या दिग्दर्शकांच्या नव्या पद्धतीची मांडणी करणारे चित्रपट रसिकांना पहायला मिळाले. फेस्टिव्हल मध्ये दाखविण्यात आलेल्या चित्रपट स्पर्धेचा निकाल ही यावेळी जाहीर करण्यात आला.
मराठी विभागात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान ‘जिप्सी’ या चित्रपटाने मिळवला तर याच चित्रपटासाठी शशी खंदारे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. अभिनेता मंगेश आरोटे यांनी ‘जिप्सी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवला. तर श्रद्धा खानोलकर हिला ‘भेरा’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. ‘छबीला’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल भालेराव आणि ‘सिनेमॅन’ या चित्रपटासाठी अभिनेता पृथ्वीराज चव्हाण यांना विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
इंडियन सिनेमा विभागात ‘जुईफूल हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार ‘बीलाइन’ या चित्रपटासाठी समिक रॉय चौधरी यांना तर ‘जुईफूल या चित्रपटासाठी जदुमोनि दत्ता यांना मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेता गौरव आंब्रे (झुंझारपूर), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जयश्री (द बर्ड ऑफ डिफरेंट फेदर )
By Sunder M