‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ चित्रपटातील रोमँटिक गाणे प्रदर्शित
‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ चित्रपटातील रोमँटिक गाणे प्रदर्शित
मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेता पुष्कर जोग नेहमीच प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट घेऊन येत असतो. अशाच एका संवेदनशील विषयावर भाष्य करणाऱ्या ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले. पोस्टरने चित्रपटाविषयीची उत्सुकता प्रचंड वाढवली असतानाच आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने चित्रपटातील ‘ओ बावरी’ हे रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केलेल्या या प्रेमगीताला सोनू निगम यांचा सुमधुर आवाज लाभला आहे. तर रोहन- रोहन यांनी जबरदस्त संगीत दिले आहे.
![YouTube player](https://i.ytimg.com/vi/Ojre1ywGExE/maxresdefault.jpg)
गाण्यातून मनातील भावना व्यक्त होत असतानाच या गाण्यातील प्रत्येक दृश्य प्रेक्षकांच्या डोळ्यांना सुखावणारे आहे. दुबईमधील प्रसिद्ध आणि नयनरम्य ठिकाणी या गाण्याचे चित्रीकरण झाले असून फुलांनी सजलेले मिरॅकल गार्डन असो किंवा दुबईचे प्रसिद्ध डेझर्ट असो. दुबईच्या भव्य आणि रमणीय ठिकाणी पार पडलेल्या चित्रीकरणामुळे या गाण्याला एक वेगळीच भव्यता प्राप्त झाली आहे. पुष्कर जोग आणि हेमल इंगळे यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांना यात पाहायला मिळतेय. “हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?” या चित्रपटात वैवाहिक जीवनातील लैंगिक सुसंगतीचे महत्त्व अधोरेखीत करण्यात आले आहे. हा चित्रपट २१ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात पुष्कर जोग, हेमल इंगळे, पूर्वी मुंदडा, विशाखा सुभेदार, अभिजीत चव्हाण, अनुष्का सरकटे, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, भरत सावळे आणि किशोरी अंबिये यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात, ” ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ हा चित्रपट वैवाहिक नातेसंबंधांवर आधारित आहे. जिथे तुम्हाला प्रेम, विश्वास, संवाद आणि मानवी भावना यांचा हृदयस्पर्शी प्रवास पाहायला मिळेल. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाला एक विशेष स्थान आहे आणि ‘ओ बावरी’ हे गाणं त्या अनोख्या भावनेचे दर्शन घडवते. गाण्याचे चित्रीकरण दुबईमध्ये झाले असून हा खूप वेगळा अनुभव होता. मला विश्वास आहे की, हे गाणे प्रेक्षकांच्या मनाचा नक्कीच ठाव घेईल.व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आम्ही हे गाणे प्रेमीयुगुलांच्या भेटीला आणले आहे. प्रत्येक कपलला हे गाणं नॅास्टेल्जिक बनवेल. जुन्या दिवसांची आठवण करून देईल किंवा ज्यांना आपल्या मनातील प्रेमभावना व्यक्त करायच्या आहेत, त्यांना हे गाणं नक्कीच मदत करू शकेल.’’
आनंद पंडित मोशन पिक्चर्स प्रस्तुत, गुझबम्प्स एंटरटेनमेंटल यांच्या सहयोगाने ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ चित्रपटाचे दिग्दर्शन व लेखन पुष्कर जोग यांनी केले असून आनंद पंडित, रुपा पंडित आणि पुष्कर जोग निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे सहलेखन नमिष चापेकर यांनी केले आहे. पॅनोरमा स्टुडिओजने या चित्रपटाच्या वितरणाची धुरा सांभाळली आहे
By Sunder M