गाव सोडून शहराकडे वळणाऱ्या सगळ्यांसाठी ‘गाव बोलावतो’, टिजर रिलीज
गाव सोडून शहराकडे वळणाऱ्या सगळ्यांसाठी ‘गाव बोलावतो’, टिजर रिलीज
‘पैसे कमावण्यासाठी गाव सोडून शहरातच जावं लागतं… हे अगदी चुकीचं आहे!’ हा महत्त्वाचा विचार समाजापुढे मांडणारा ‘गाव बोलावतो’ हा चित्रपट ७ मार्च रोजी प्रदर्शित होतोय. या चित्रपटाचे टिजर आज (ता. १३) रिलीज करण्यात आले. भूषण प्रधान, गौरी नलावडे, माधव अभ्यंकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट शेतकरी राजा आणि त्याची पुढची पिढी गाव-खेड्यांकडे कोणत्या दृष्टीने बघते यावर भाष्य करणारा हा चित्रपट असेल.
शेतीवर आणि गावावर निस्सीम प्रेम करणारे वडिल, पैसे कमावण्याच्या हेतुने गावातून बाहेर पडलेला मुलगा आणि त्यानंतर गावाला आपली गरज आहे या जाणीवेने पुन्हा गावात आलेला तोच मुलगा आणि गावातील इतर मंडळी यांच्या गोष्टींवर बेतलेला हा चित्रपट असेल. गावाच्या भल्यासाठी, विकासासाठी गावातीलच नागरिकांनी एकत्र येऊन गाव सुधारायला हवं असा संदेश या चित्रपटाच्या टिजर मधून मिळतोय. गावातील तरूणाई नोकरी-उद्योगांसाठी शहरात जाते, त्यामुळे एकीकडे शहरं वाढतचं चालली आहेत, तर दुसरीकडे गावं ओसाड पडताना दिसू लागली आहेत. गावात कोणत्याही प्रकारचे विकासकाम करताना त्यात विघ्न आणणारेही अनेक असतात, पण तरूण पिढीने मनावर घेतल्यास ते सर्व प्रकारचे बदल घडवून आणू शकतात, यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.
शेती, जोडधंदा, गावकरी मंडळी, गावचं राजकराण, प्रेम, समर्पण, त्याग, भावभावना या सगळ्याचं समीकरण असलेल्या ‘गाव बोलवतो’ या चित्रपटात भूषण प्रधान, माधव अभ्यंकर, गौरी नलावडे यांच्यासोबतच श्रीकांत यादव, राजेश भोसले , अरविंद परब, किरण शरद यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपटात ग्रामीण प्रश्नांवर आणि समस्यांवर भाष्य करण्यात आलंय त्यामुळे सर्वांनाच या चित्रपटाची प्रतिक्षा आहे.
संस्कार वाहिनी प्रोडक्शन आणि फिल्मिटेरियन मीडिया वर्क्स निर्मित ‘गाव बोलावतो’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विनोद माणिकराव हे आहेत. तर निर्माते प्रशांत मधुकर नरोडे, शंतनू श्रीकांत भाके हे आहेत, तर व्हिज्युअल बर्ड्स इन्स्टिट्यूट अँड स्टुडिओ, अमित मालवीय, प्रवीण इंदू, गणेश इंगोले, सुधीर इंगळे, तुषार खेरडे, दिनेश राउत हे सहनिर्माते आहेत. ७ मार्चपासून हा चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित होईल

By Sunder M