EntertainmentMarathi

सुप्रसिद्ध गायक चैतन्य देवढेच्या आवाजातील धम्माल मैत्रीचं “पोर बदनाम” गाणं प्रदर्शित

सुप्रसिद्ध गायक चैतन्य देवढेच्या आवाजातील धम्माल मैत्रीचं “पोर बदनाम” गाणं प्रदर्शित

पौर्णिमेचा फेरा या वेबसिरीजच्या यशानंतर शुभम प्रोडक्शन घेऊन आले आहेत मैत्रीचं धम्माल गाणं “पोर बदनाम”. हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं असून विशेष म्हणजे या गाण्याने प्रदर्शित होताच अवघ्या ८ तासात १ मिलीयनचा टप्पा पार केला आहे. तसेच या गाण्यावर अनेक प्रेक्षक सोशल मीडियाच्या माध्यमातून रील्स देखील बनवत आहेत. या गाण्यात महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेता निखिल बने, मंदार मांडवकर आणि सिद्धेश नागवेकर हे प्रमुख कलाकार आहेत. तर सुप्रसिद्ध गायक चैतन्य देवढेने त्याच्या सुरेल आवाजात हे गाणं गायलं आहे.

“पोर बदनाम” हे गाणं शुभम प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार झाले असून या गाण्याची निर्मिती पायल गणेश कदम आणि गणेश दिनकर कदम यांनी केली आहे. तर सचिन आंबात यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. या गाण्याचे बोल अनिरूद्ध निमकर याने लिहीले असून त्यानेच या गाण्याला संगीत दिले आहे. हे गाणं नाशिकमध्ये चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्याची कथा तीन जिगरी मित्रांवर आधारित असून गाण्याचा शेवट प्रेक्षकांना जास्त आवडला आहे.

गायक चैतन्य देवढे गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगतो,“पोर बदनाम हे गाण खूप व्हायरल होत आहे. १ मिलियन व्ह्यूज क्रॉस झालेत ते ही ८ तासात. गाण्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. मला पर्सनली फॅन्सचे खूप कॉल्स, मॅसेजेस येत आहेत. मी गणेश सर, शुभम प्रॉडक्शन्स टीम आणि मायबाप प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो. राम कृष्ण हरी!!”

हास्यजत्रा फेम अभिनेता निखिल बने गाण्याच्या चित्रीकरणाच्या अनुभवाविषयी सांगतो, “या गाण्याच शूटिंग नाशिकला रात्रीच करण्यात आल. आम्ही एका रात्रीतच शूटिंग पूर्ण केल आहे. मला एक तर अजिबात डान्स येत नाही. पण दिग्दर्शक सचिन आंबात आणि कोरिओग्राफर व्यंकटेश गावडे यांनी माझ्याकडून डान्स करवून घेतला. आणि माझे दोन जिगरी मित्र मंदार मांडवकर आणि सिद्धेश नागवेकर यांनी मला गाण्यात साथ दिली. अश्याप्रकारे हे गाण तयार झाल आहे. प्रेक्षकांना माझी एक विनंती आहे की या गाण्याचा शेवट अजिबात चुकवू नका.”

निर्माते गणेश कदम ‘पोर बदनाम’ गाण्याच्या चित्रीकरणाविषयी सांगतात,” शुभम प्रोडक्श प्रस्तुत हॉरर कॉमेडी या जॉनरमधील असलेल्या पौर्णिमेचा फेरा या वेबसिरीजला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आम्ही यावेळी काहीतरी वेगळं म्हणून गाणं करायचं ठरवलं. रोमॅंटीक गाणी सगळेच करतात तेव्हा आमच्या टीमने ठरवलं की यावेळी मैत्रीवर गाणं करूया. संगीतकार अनिरूद्ध निमकर याला आम्ही ही संकल्पना सुचवली आणि त्याने आम्हाला हे गाणं करून पाठवलं आम्हाला ते गाणं फार आवडलं. गायक चैतन्यच्या सुरेल आवाजामुळे हे गाणं परीपूर्ण झालं. शिवाय निखिल बने, मंदार मांडवकर आणि सिद्धेश नागवेकरने तर या गाण्याला चार चांद लावले आहेत. सोशल मीडियावरील प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद पाहता हे गाणं त्यांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळे गाणं प्रदर्शित होताच या गाण्याला त्याच दिवशी १ मीलियन लोकांची पसंती मिळाली. त्यामुळे आमच्या सर्वांचा आनंद गगनात मावत नाही आहे.”

मधुर संगीत, सुंदर कथा आणि लाजवाब लोकेशन्सच्या माध्यमातून ‘पोर बदनाम’ हे गाणं कमाल झालं आहे. तुमच्या मित्रांसोबत धम्माल, मस्ती करण्यासाठी हे गाण नक्की बघा !

YouTube player

 

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *