समीर धर्माधिकारी, मकरंद देशपांडे, अनघा अतुल यांची मध्यवर्ती भूमिका असलेली “छबी” ९ मेपासून संपूर्ण महाराष्ट्रात
समीर धर्माधिकारी, मकरंद देशपांडे, अनघा अतुल यांची मध्यवर्ती भूमिका असलेली “छबी” ९ मेपासून संपूर्ण महाराष्ट्रात
कोकणात फोटोग्राफी करणाऱ्या फोटोग्राफरला आलेल्या गूढरम्य अनुभवाची थरारक गोष्ट छबी या चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटाचा अतिशय रंजक टीझर लाँच करण्यात आला असून, छबी हा चित्रपट ९ मेपासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
केके फिल्म्स क्रिएशन, उप्स डिजिटल एंटरटेन्मेेंट यांनी “छबी” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जया तलक्षी छेडा निर्माता आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अद्वैत मसूरकर यांच असून त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटात ध्रुव छेडा, सृष्टी बाहेकर, अनघा अतुल, रोहित लाड, ज्ञानेश दाभणे , अपूर्वा कवडे या नव्या दमाच्या कलाकारांसह अभिनेता समीर धर्माधिकारी, अभिनेते मकरंद देशपांडे, अभिनेत्री शुभांगी गोखले, राजन भिसे, जयवंत वाडकर,संकेत मोरे, संजय कुलकर्णी, लीना पंडित असे अनुभवी कलाकार आहेत. त्यामुळे चित्रपटाची अभिनयाची बाजू खणखणीत आहे यात शंका नाही.
फोटोग्राफी स्पर्धेसाठी एक तरूण फोटोग्राफर कोकणातल्या गावात फोटो काढतो. मात्र त्या फोटोमध्ये कुणीच नसतं. हे असं का झालं याचा नाट्यमय शोध “छबी” या चित्रपटात आहे. गूढरम्य आणि नावीन्यपूर्ण कथानक, परिणाकारक पार्श्वसंगीत या मुळे हा टीझर प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, तसंच चित्रपटाविषयी उत्सुकताही वाढवतो. आजवर चित्रपटांमधून फोटोग्राफरची, एखाद्या फोटोची गोष्ट फारशी मांडली गेलेली नाही. अशा कथानकाला गूढरम्यतेची पार्श्वभूमी असल्यानं “छबी” हा सध्याच्या चित्रपटांमध्ये नक्कीच वेगळा प्रयत्न ठरणार आहे. या गूढरम्यतेचा अनुभव मोठ्या पडद्यावर घेण्यासाठी आता ९ मेपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

By Sunder M