EntertainmentMarathi

‘वेल डन आई’मध्ये विशाखा सुभेदारची धम्माल १४ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित

‘वेल डन आई’मध्ये विशाखा सुभेदारची धम्माल
१४ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित

शिकलेली किंवा अशिक्षीत… मॅाडर्न किंवा साधीभोळी… शांत किंवा तापट… कशीही असली तरी आई ही आई असते. निसर्गाने आईला पुनर्निमितीचे वरदान दिले आहे. त्याच कारणामुळे देवानंतर पहिले स्थान आईचे मानले जाते. आजवर अनेक कवींनी शब्दांची उधळण करीत आईचे गोडवे गायले आहेत. फिल्ममेकर्सनी आईचे वेगवेगळे पैलू रुपेरी पडद्यावर सादर केले आहेत. तरीही आईची महती संपणारी नाही. आता आईवर आधारलेला एक नवा कोरा विनोदी मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘वेल डन आई’ असे या चित्रपटाचे शीर्षक आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. हा चित्रपट १४ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

दीपाली प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या ‘वेल डन आई’ चित्रपटाची निर्मिती सुधीर पाटील यांनी केली आहे. शंकर अर्चना बापू धुलगुडे यांनी या चित्रपटाचे लेखन केले असून, दिग्दर्शनही केले आहे. या चित्रपटात एका अशा आईची गोष्ट पाहायला मिळणार आहे, जी आपल्या मुलावर जीवापाड प्रेम करणारी आहे. मुलाच्या सुखासाठी नवऱ्याशी, जगाशी वैर घेणारी आहे. घरसंसार चालवण्यासाठी खानावळीत काम करण्यासोबतच इतरही छोटे व्यवसाय करणारी ही आई जगातील असंख्य आईंचे प्रतिनिधीत्व करणारी आहे. आईची धमाल व्यक्तिरेखा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाद्वारे घरोघरी पोहोचलेली विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार यांनी साकारली आहे. यात विशाखाच्या जोडीला विजय निकम, आयुष पाटील, जयवंत वाडकर, सिमरन खेडेकर, बीना सिद्धार्थ, तन्वी धुरी, विपुल खंडाळे आदी कलाकार आहेत. प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरला ‘वेल डन आई’ या शीर्षक गीताची जोड देण्यात आली आहे. चाळीची पार्श्वभूमी असलेल्या पोस्टरमध्ये दोन्ही हातांनी थम्प-अप करणारी आईच्या रूपातील विशाखा सुभेदार दिसते. या पोस्टरसोबतच १४ नोव्हेंबरही प्रदर्शनाची तारीखही घोषित करण्यात आली आहे. सिनेपोलीस या चित्रपटाचे वितरण करणार आहे.

चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संदीप गचांडे आणि शंकर धुलगुडे यांनी केले आहे. छायांकन रंजीत साहू यांनी केले असून संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. संदीप गचांडे यांच्या लेखणीतून साकारलेली गीते संगीतकार निशाद गोलांबरे यांनी संगीतबद्ध केली आहेत. राज्यपाल सिंह यांनी कार्यकारी निर्मात्याची भूमिका चोख बजावली असून काफिल अन्सारी यांनी प्रोडक्शन हेड म्हणून काम पाहिले आहे. पार्श्वसंगीत – ऍग्नेल रोमन, कलादिग्दर्शन – देवेंद्र तावडे, वेशभूषा – प्रतिभा गायकवाड, रंगभूषा – माधव म्हापणकर, केशभूषा – मयुरी बस्तावडेकर, नृत्य दिग्दर्शन – चिनी चेतन, सह दिग्दर्शन – मानस रेडकर, पोस्ट प्रोडक्शन – आय फोकस स्टुडिओ (विजय दिनेश), विज्युअल प्रमोशन – प्रेमांकुर बोस अशी श्रेयनामावली आहे.

 

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *