तीन मित्रांच्या भोवतीचा पौर्णिमेचा फेरा उलगडणार की अजून गुंता वाढणार, ‘पौर्णिमेचा फेरा सिझन २’ प्रदर्शित
शुभम प्रोडक्शन फिल्म्स प्रस्तुत आणि पायल गणेश कदम निर्मित ‘पौर्णिमेचा फेरा सिझन १’ ह्या वेबसिरिजला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे आणि प्रोत्साहनामुळे ‘पौर्णिमेचा फेरा सिझन २ ’ शुभम प्रोडक्शन चॅनलवर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘पौर्णिमेचा फेरा सिझन २’ देखील सिझन १ इतकाच हॉरर आणि चित्तथरारक आहे.ही एक वेगळ्या धाटणीची दर्जेदार हॉरर कॉमेडी मराठी वेब सिरीज आहे.
मराठीत हॉरर-कॉमेडी पठडीतला सिनेमा किंवा वेब सिरीज फार क्वचितच बघायला मिळतात. कोकणातले निसर्गसौंदर्य यासोबत हॉरर, कॉमेडी आणि रहस्याचे मिश्रण असलेली ही वेब सिरीज प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यास यशस्वी ठरते. आपण जो विचार करतो त्या पलीकडे जाऊन आपल्या आजूबाजूला घटना घडत असतात. अनाकलनीय आणि भीतीदायक वाटणाऱ्या या घटनांमागचं नेमकं रहस्य काय आहे याचा उलगडा करत जाणारी ही एक रंजनीय वेब सिरीज आहे. एक चांगलं कथानक आणि त्याभोवती गुंफलेली गुंतवून ठेवणारी पटकथा ही या वेब सिरीजची जमेची बाजू आहे; जी तुम्हाला नक्कीच आवडेल.
अवधूत, संकेत आणि अमेय या तीन मित्रांभोवती फिरणारं हे कथानक आहे. मैत्रीसाठी कोणत्याही संकटाशी भिडायला तयार होणारे मित्र आपल्याला यात बघायला मिळतात. तिघेही अमेयच्या गावी कोकणात जातात. तिकडे गेल्यावर अवधूतसोबत अशा काही रहस्यमयी घटना घडायला लागतात ज्या सामान्य आयुष्यात घडणं शक्य नाही. आणि त्या मागचं गूढ नेमकं काय आहे ते संकेत आणि अमेयला उलगडत नाही. पण या घटनांमधून त्यांचा फायदाही होत आहे. त्या फायद्यामुळे निर्माण झालेले लालच, अमानवी शक्ती, त्यामुळे निर्माण झालेले संकट आणि त्या संकटातून कधी मुक्तता मिळेल कि नाही ? या सगळ्या गोष्टी यात व्यवस्थित मांडण्यात आल्या आहेत.
थरार, उत्कंठा, शोध या नजरबंदीच्या खेळातून अनुत्तरीत प्रश्नांचा शोध घेणारी ‘पौर्णिमेचा फेरा’ ही मराठी वेब सिरीज ‘शुभम प्रोडक्शन फिल्म्स’ या चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आली आहे. हास्यजत्रा कार्यक्रमातले विनोदवीर निखील बने आणि मंदार मांडवकर आपल्याला या वेब सिरीजमध्ये वेगळ्याच भूमिकेत पहायला मिळतात. त्यांना सिद्धेश नागवेकर या नव्या दमाच्या कलाकारासोबत, संदीप रेडकर, दीपा माळकर, प्राची केळुस्कर, निकिता बंदावणे, चंदन जमदाडे, संजय वैद्य, स्नेहल आयरे या सगळ्यांची साथ लाभली आहे. सगळ्या कलाकारांनी त्यांच्या भूमिका चांगल्या केल्या आहेत. ही वेब सिरीज बघताना प्रत्येकजण त्या त्या भूमिकेत चपखल बसलेला असल्याचं जाणवतं.
ह्या वेब सिरीजचे दिग्दर्शन अजय सरतापे यांनी केले असून त्याचे छायाचित्रण कुणाल महादेव परडकर ह्यांनी केले आहे. दिग्दर्शन, छायाचित्रण या कथेचा रॉनेसपणा जपत उत्कंठा निर्माण करण्यात यशस्वी झालेले आहेत. जितकं उत्तम दिग्दर्शन ह्या सिरीजला लाभलं आहे तितकच उत्तम लेखण देखील ह्या सिरीजला लाभलं आहे. ह्या वेब सिरीजची कथा शुभम विलास कदम याने लिहिली असून ह्या सिरीजचे संवाद व लेखन संदेश लोकेगावकर यांनी केले आहे. हॉरर म्हटलं कि सगळ्यात महत्वाचं असतं ते पार्श्वसंगीत. या वेब सिरीजचं पार्श्वसंगीत अगदी पूरक आहे. ते योग्य त्या ठिकाणी त्या सीनच्या गरजेनुसार भेदक वातावरण तयार करतं आणि ह्याचं सर्व यश अनिरुद्ध निमकर ज्यांनी ह्या सिरीज ला पार्श्वसंगीत दिलं त्यांना जातं.
एकंदरीत कोकणात घडणारी ‘पौर्णिमेचा फेरा’ ही हॉरर कॉमेडी वेब सिरीज तुमचं मनोरंजन नक्कीच करते. याचे दोन्ही सिझन तुम्हाला खिळवून ठेवतात. त्यामुळे ‘शुभम प्रोडक्शन फिल्म्स’ या चॅनेलवर यापुढेही अशाच वेगवेगळ्या धाटणीच्या वेब सिरीज बघायला मिळतील अशी अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही. ज्यांना हॉरर-कॉमेडी आवडते त्यांनी ही सिरीज नक्कीच पहावी.

By Sunder M