Uncategorized

‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित

लव्हस्टोरी, घोस्ट कॉमेडीचा धमाका

प्रेम, भूत आणि हास्याचा भन्नाट मेळ घालणारा आगामी मराठी चित्रपट ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. या घोस्ट कॉमेडीचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या उत्सुकतेला अधिकच उधाण आले आहे. सुबोध भावे आणि रिंकू राजगुरू ही हटके जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर धमाल उडवायला सज्ज झाली आहे. या आधी ‘पालतू फालतू’ या मजेशीर गाण्यामुळे आणि ‘ना कळले कधी तुला’ या भावनिक गीतामुळे चित्रपटाविषयी कुतूहल निर्माण झालं होतंच, परंतु आता आलेल्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांना या प्रेमकथेच्या गोंधळातल्या धमाल प्रवासाची झलक पाहायला मिळाली आहे.

YouTube player

सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा प्रस्तुत, रजत मीडिया एंटरटेनमेंट निर्मित या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये एक वेगळी आणि हटके प्रेमकथा उलगडताना दिसते. सुबोध भावे याची ‘बेटर-हाफ’ म्हणजे पत्नी गेल्यानंतर तिचा आत्मा त्याच्याच शरीरात वास करत असल्याचं गोंधळलेलं चित्र ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. त्यातून सुटका मिळवण्यासाठी सुरू होतो विनोदी संघर्ष, ज्यात प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव यांची त्याला साथ मिळते. आता यातून सुबोध भावाची सुटका होते का, याचे उत्तर मात्र प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे.

दिग्दर्शक संजय अमर या चित्रपटाविषयी सांगतात, “ही घोस्ट कॉमेडी असली तरी ती एका आगळ्यावेगळ्या प्रेमकथेची सांगड घालते. कलाकारांच्या ताकदीमुळे ही संकल्पना पडद्यावर प्रभावीपणे साकारता आली. सुबोध आणि रिंकूची फ्रेश जोडी, प्रार्थना आणि अनिकेतसारखे अनुभवी कलाकार यांचं योगदान अमूल्य आहे.”

चित्रपटाचे निर्माता रजत अग्रवाल म्हणतात, “आजच्या पिढीला नेहमी काहीतरी हटके आणि नाविन्यपूर्ण बघायचं असतं. ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. यामध्ये विनोद, सस्पेन्स, भावना आणि स्टारकास्ट यांचं परिपूर्ण मिश्रण आहे.”

या चित्रपटाचे लेखन, छायांकन आणि दिग्दर्शन संजय अमर यांचेच असून, साजन पटेल आणि अमेय नरे यांनी संगीताची जबाबदारी सांभाळली आहे. सुबोध भावे, रिंकू राजगुरू, प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्यासारख्या दमदार कलाकारांच्या अभिनयाने साकारलेला हा सिनेमा येत्या २२ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *