प्रेम, जिद्द आणि कलेचं बीज पेरणारा ‘झिंग’ चित्रपट होणार १९ सप्टेंबरला प्रदर्शित!!
स्वप्न प्रत्येकजण पाहत असतो. कुणी आई-वडिलांचं, कुणी स्वतःच तर कुणी पत्नीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असतं. स्वप्न पाहणं आणि ते पूर्ण करणं यांत खरं साहस आहे. स्वप्न पूर्ण करण्यात लागलेल्या एका किसनाची कथा लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. गावातील उनाड पण मनाने सच्चा आणि स्वप्नवेड्या किसनाच्या वडिलांच अपूर्ण राहिलेलं तमाशाचा फड उभारण्याचं राहिलेलं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या या मेहनती लेकाचा प्रवास झिंग या नव्याकोऱ्या ‘झिंग’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. येत्या १९ सप्टेंबरपासून हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
टाळ्या, शिट्ट्यांच्या गजरात ही मैफिल किसना कशी रंगवणार हे पाहणं या चित्रपटात रंजक ठरेल.आजोबांचा विरोध, गावकऱ्यांचा अविश्वास आणि पाटलांचं राजकारण यांतून मार्ग काढत किसना वडिलांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रंगमंच गाजवणार का?, हा कठीण प्रवास तो पार करणार का? हे सारं चित्रपटात पाहायला मिळेल. बरं चित्रपटात दिसणारा हा किसना नेमका कोण आहे, ही रंगतदार भूमिका कोण साकारतय याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. शिवाय चित्रपटात आणखी कोणते कलाकार दिसणार हेदेखील अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. गावच्या मनात प्रेम, जिद्द आणि कलेचं बीज किसना पेरु शकेल का? की, हे सगळं फक्त त्याच्या स्वप्नांपुरतच सिमीत राहील याचाही उलगडा लवकर होईल.
‘ड्रीम लालटन प्रॉडक्शन’ आणि ‘रेडब्रिक्स मोशन पिक्चर’ या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत निर्माते दिपक पेटकर आणि सौरभ किरणकुमार कुंभार निर्मित ‘झिंग’ हा चित्रपट दिग्दर्शक अमित वाल्मिक कोळी दिग्दर्शित आहे. तर हा संपूर्ण चित्रपट प्रताप जोशी यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. तर संगीतकार पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. मुकुंद भालेराव, मंदार चोळकर आणि शुभम चौधरी यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. तर नृत्य दिग्दर्शक म्हणून आशिष पाटील यांनी बाजू सांभाळली आहे. ‘झिंग’ हा चित्रपट संगीतमय मैफिलीत अनेक रंग भरणारा आहे. येत्या १९ सप्टेंबरपासून हा चित्रपट जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होईल.
By Sunder M