मनाचे श्लोक’मधून लीना भागवत – मंगेश कदम मोठ्या पडद्यावर प्रथमच आमने-सामने येणार
‘आमने सामने’, ‘इवलेसे रोप’, ‘तू अभीतक है हसीन’ यांसारकाही नाटके, मालिका आणि सिरीजमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवणारी हिट जोडी म्हणजे लीना भागवत आणि मंगेश कदम. त्यांची भन्नाट केमिस्ट्री प्रेक्षकांना नेहमीच भावते. रंगभूमीवर एकमेकांना पूरक ठरणारी ही जोडी प्रेक्षकांसाठी आता एक सरप्राईज घेऊन येत आहे. ‘मना’चे श्लोक’ या चित्रपटातून लीना भागवत, मंगेश कदम ही हिट जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रत्यक्ष आयुष्यात एकमेकांचे जोडीदार असलेले मंगेश आणि लीना आता रुपेरी पडद्यावरही एकत्र दिसणार असल्याने त्यांच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यांची भन्नाट ऑन-स्क्रीन केमिस्ट्री व कमाल टाईमिंग नेहमीच अप्रतिम असल्याने ‘मना’चे श्लोक’ मध्ये त्यांची केमिस्ट्री पाहाणे देखील प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक ठरेल.
याबद्दल लीना भागवत म्हणतात, ” मराठी प्रेक्षकांनी आम्हाला रंगभूमीवर नेहमीच प्रचंड प्रेम दिलं. आता पहिल्यांदाच आम्ही ‘मना’चे श्लोक’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहोत. यासाठी प्रेक्षकांप्रमाणे आम्हीही उत्सुक आहोत. पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र काम करणं ही नवी आणि सुंदर अनुभूती आहे. मला खात्री आहे प्रेक्षक आम्हाला मोठ्या पडद्यावरही तेवढंच प्रेम देतील.”
मंगेश कदम म्हणतात, “नाटक आणि चित्रपटाचा अनुभव वेगळा असतो. मात्र लीनासोबत स्क्रीन शेअर करणं हे नेहमीच मजेशीर आणि समाधानकारक असतं. ‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट आमच्यासाठीही खास आहे, कारण यात आमची जोडी एका वेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत आहे.”
‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट १० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. याचे लेखन आणि दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे यांनी केले असून निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा आहेत. या चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब असे कलाकार आहेत. हा चित्रपट स्टारलाईट बॉक्स थिएटर्स आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
By Sunder M