EntertainmentMarathi

‘वडापाव’च्या टीमसाठी साकारला भव्य वडापाव

हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी व शेफ्सची कमाल पाककृती!

सध्या सर्वत्र ‘वडापाव’ या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. चित्रपटातील गाणी व ट्रेलरला प्रेक्षकांचा कमाल प्रतिसाद मिळत आहे. तसेच चित्रपटाचे प्रमोशनही जोरदार सुरू आहे. या बहुचर्चित चित्रपटाचा भाग होण्यासाठी रामनाथ पय्याडे कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी स्टडीज यांनी ‘वडापाव’ च्या टीमला खास आमंत्रित करून त्यांना एक भन्नाट सरप्राईज दिले. कॉलेजमधील टॅलेंटेड शेफ्सनी तब्बल साडे सात किलोचा वडापाव बनवला! शेफ्सची ही पाककृती पाहून ‘वडापाव’ ची टीम थक्क झाली व त्यांनी या वडापावचा आस्वाद घेतला.

या खास प्रसंगी प्रसाद ओक गौरी नलावडे, रितिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, सिद्धार्थ साळवी, शाल्व किंजवडेकर, डॉ. महेश पटवर्धन व निर्माते अमेय खोपकर, निनाद बत्तीन, मौसीन खान उपस्थित होते.

यावेळी दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणाले, “ हे एक खरच खूप सुंदर सरप्राईज आहे. इतका मोठा वडापाव साकारणं अतिशय कठीण व आव्हानात्मक आहे. मात्र, या शेफ्सच कौतुक करण्यासारखं आहे. त्यांनी साडे सात किलोचा हा वडापाव आमच्यासाठी तयार केला. या कुरकुरीत सरप्राईजसाठी मी संपूर्ण टीमकडून कॉलेजमधील शेफ्स आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. आज आम्हाला हा भव्य आणि चविष्ट वडापाव भेट म्हणून मिळाला, आणि आम्हीही तुम्हा सर्वांना आमच्या ‘वडापाव’ची भेट २ ऑक्टोबरला देणार आहोत.”

एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, मर्ज एक्सआर स्टुडिओ, व्हिक्टर मुव्हीज लिमिटेड, अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि मोहसीन खान प्रस्तुत, सिनेमॅटिक किडा बॅनरअंतर्गत हा चित्रपट निर्मित झाला आहे. निर्माते अमित बस्नेत, प्रजय कामत, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन असून सहनिर्माते तबरेझ एम. पटेल आणि सानीस खाकुरेल आहेत. छायाचित्रण दिग्दर्शक संजय मेमाणे तर लेखन सिद्धार्थ साळवी यांनी केलं आहे. या चित्रपटात प्रसाद ओक, गौरी नलावडे, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे यांच्या भूमिका आहेत. येत्या २ ॲाक्टोबर रोजी ’वडापाव’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *