EntertainmentMarathi

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’मधील महेश मांजरेकर यांच्या लूकची सर्वत्र चर्चा

पहिल्यांदाच झळकणार साधूच्या रूपात !

महेश वामन मांजरेकर लिखित, दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रेक्षकांसमोर आला असून, टिझर पाहून या सिनेमाबद्दलची उत्कंठा प्रेक्षकांच्या मनात चांगलीच वाढली आहे आणि त्यात भर घातली ती काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘दुर्गे दुर्गट भारी’ या गाण्याने. या गाण्यात दिसणारा महेश मांजरेकर यांचा लूक प्रेक्षकांसाठी मोठं सरप्राईज ठरला आहे. आतापर्यंत विविध सकारात्मक, नकारात्मक भूमिकांमध्ये दिसलेले मांजरेकर पहिल्यांदाच साधूच्या भूमिकेत झळकत आहेत. त्यामुळे त्यांच्या या नवीन अवताराकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

या गाण्यात महेश मांजरेकर यांचा साधू रूपातील अतिशय वेगळा लूक पाहायला मिळत आहे. डोक्यावर भगवा कपडा, गळाभोवती रुद्राक्षांच्या माळा, विस्कटलेले केस, लांब दाढी आणि हातात शंख, या सर्वांमुळे त्यांची व्यक्तिरेखा प्रचंड उठून दिसते. त्यांच्या चेहऱ्यावरील तीव्रता, डोळ्यातील चमक आणि व्यक्त होणारा करारी भाव पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी चाळवली आहे.

महेश मांजरेकर आपल्या या लूकविषयी म्हणाले, ‘’आजवर मी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. परंतु साधूच्या व्यक्तिरेखेत मी कधीच दिसलो नव्हतो. हा लूक माझ्या नेहमीच्या लूकपेक्षा पूर्ण वेगळा आहे. यातली गूढता, ताकद आणि अध्यात्मिक छटा हे सगळं एकत्र येऊन या भूमिकेला एक आगळावेगळा आयाम मिळाला आहे. माझ्यासाठी ही एक नवी आणि वेगळीच अभिनययात्रा ठरणार आहे.”

या भन्नाट लूकमुळे आणि प्रभावी गाण्यामुळे ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चर्चेत आला असून, प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्कंठा आणखी वाढली आहे.

झी स्टुडिओज प्रस्तुत, द ग्रेट मराठा एंटरटेनमेंट, सत्य सई फिल्म्स आणि क्रिझोल्ह निर्मित हा चित्रपट येत्या ३१ ॲाक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध या चित्रपटाचे निर्माते असून यात सिद्धार्थ बोडके, विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *