चिरंजीव परफेक्ट बिघडलाय !
चिरंजीव परफेक्ट बिघडलाय !
गेल्या दोन वर्षांपासून पुण्याचा लेखक-दिग्दर्शक विनोद रत्ना आणि त्याच्या ग्रुपने एकापाठोपाठ एकांकिका स्पर्धा जिंकून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतंच. यावर्षी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्वच्या सर्व पारितोषिकं ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ या एकांकिकेने पटकावली. लेखन, दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना या सर्वच स्तरावर काही नवे प्रयोग त्यात केलेले दिसले. याच एकांकिकेचं पूर्ण लांबीच्या नाटकात केलेलं रुपांतर मराठी रंगभूमीदिनाच्या मुहूर्तावर ५ नोव्हेंबर २०२५ रोजी व्यावसायिक रंगभूमीवर येत आहे. चंद्रकांत कुलकर्णी हे नाटक सादर करणार असून, वैशिष्ट्य म्हणजे ओरिजिनल संचातच ही ऊर्जावान रंगकर्मी मंडळी आपल्याला मुख्यधारेतल्या रंगभूमीवर दिसणार आहेत. ‘जिगीषा’ संस्थेची ही निर्मिती असून नाटकाच्या तालमी जोरात सुरु आहेत.
एकांकिका, दीर्घांक स्पर्धा, राज्यनाट्य स्पर्धा, समांतर रंगभूमीवरुन व्यावसायिक रंगभूमीवर येण्याचा हा नाट्यप्रवास महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना परिचित आहेच पण अत्यंत सळसळत्या ऊर्जेची, नव्या पिढीची, नव्या दमाची लेखक-दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्रींची टीम यानिमित्ताने कार्यरत होते. ‘ऑल दि बेस्ट’, ‘मनोमिलन’ अशा उदाहरणांनी हे घवघवीत यश या आधीही अधोरेखित झाले आहे.
आशय-विषय मांडणीत असलेला हा नव्या पिढीचा दृष्टीकोन नाविन्यपूर्ण आणि वेगळ्या रंगमंचीय शक्यतांना सामोरं जाताना दिसतो. नव्या जेन झी पिढीची ही नवलकथा रंगमंचावर आणताना आम्हाला नव्या पिढीशी एक नातं निर्माण करण्याची संधी मिळतेय. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वसा देण्याचा आमचा उद्देश आहे अशी प्रतिक्रिया निर्माते श्रीपाद पद्माकर, दिलीप जाधव आणि सादरकर्ते चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिली आहे.
लेखन-दिग्दर्शनाची दुहेरी धुरा सांभाळणाऱ्या विनोद रत्ना आणि बक्षिसांची लयलूट करणाऱ्या समृद्धी कुलकर्णी, श्रेयस जोशी, वैभव रंधवे या कलावंतांच्या नव्या सादरीकरणाला महाराष्ट्रातले जाणकार प्रेक्षक भरभरुन दाद देतील अशीही अपेक्षा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.
श्रेय नामावली-
लेखक- दिग्दर्शक विनोद रत्ना
नेपथ्य : ऋतुजा बोठे
प्रकाशयोजना: अभिप्राय कामठे
संगीत : कलादर्शन, पुणे
सुत्रधार : प्रणित बोडके
कलाकार :
समृद्धी कुलकर्णी
श्रेयस जोशी
वैभव रंधवेत
By Sunder M