आमचा ट्रेलर बघू नका !’ ‘गोंधळ’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे अनोखे आवाहन चर्चेत
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत ग्लॅमरसोबतच महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेला सन्मान देणारे चित्रपट मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. अशाच परंपरेचा गाभा उलगडणारा बहुचर्चित ‘गोंधळ’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता पसरली आहे. आता या उत्सुकतेत भर घालत दिग्दर्शक संतोष डावखर यांनी एक अनोखे आवाहन केले आहे, “आमचा ट्रेलर बघू नका!”
आजकाल जिथे चित्रपटांच्या ट्रेलरचे जोरदार प्रमोशन केले जाते, तिथे ‘गोंधळ’ टीमने उलटा प्रयोग केला आहे. दिग्दर्शक संतोष डावखर म्हणतात की, त्यांनी प्रेक्षकांना ट्रेलर न पाहाण्याचे आवाहन करून चित्रपटाबद्दलची कुतूहल वाढवण्याचा मानस ठेवला आहे. सोशल मीडियावर ही प्रमोशन स्ट्रॅटेजी सध्या जोरदार चर्चेचा विषय बनली आहे आणि प्रेक्षक या निर्णयाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक झाले आहेत.
संतोष डावखर म्हणतात, “‘गोंधळ’ची कथा, पात्रे आणि कलाकार अतिशय रंजक आहेत; त्यामुळे प्रेक्षकांनी ट्रेलरपेक्षा संपूर्ण चित्रपट थेट सिनेमागृहात बसून पाहावा. प्रत्येक पात्र हळूहळू गूढ उलगडत जाते. नाहीतर चित्रपटातील थ्रिल थोडा २-३ टक्के कमी होऊ शकतो. चित्रपट पाहिल्यानंतरच या कथेचा गाभा, भावना आणि महाराष्ट्राच्या परंपरेचा खरा रंग प्रेक्षकांना जाणवेल. ज्यांना चित्रपटाबद्दल काही शंका असतील, त्यांनीच ट्रेलर पाहावा. काही गोष्टी या चित्रपटात अशा आहेत ज्या ७० एमएम पटलावर प्रदर्शित होणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये प्रथमच दिसतील.”
डावखर फिल्म्स प्रस्तुत ‘गोंधळ’ची कथा, पटकथा आणि संवाद संतोष डावखर यांनी लिहिले असून सहनिर्मात्या दीक्षा डावखर आहेत. चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील आणि ध्रुव ठोके यांसह अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
‘गोंधळ’ चित्रपटाचे मेकिंग यूट्यूबवर प्रदर्शित झाले असून चित्रपटात दमदार टीम असल्याचे दिसतेय. दरम्यान, ट्रेलर न पाहाण्याचे हे आवाहन प्रेक्षकांच्या उत्सुकतेत वाढ करेल की कमी, याचा परिणाम लवकरच स्पष्ट होईल.
By Sunder M
