‘आली मोठी शहाणी’च्या गोव्यातील चित्रीकरणाचा श्रीगणेशा !
हृता दुर्गुळे – सारंग साठ्ये पहिल्यांदाच एकत्र
काही दिवसांपूर्वी घोषित झालेल्या ‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. आता या चित्रपटाच्या गोव्यातील चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला असून, या निमित्ताने प्रेक्षकांसमोर एक नवी आणि हटके जोडी झळकणार आहे ती म्हणजे हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्येची! या दोघांची फ्रेश ऑनस्क्रीन केमिस्ट्री नेमकी कशी असणार, हे पाहाण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. हृता तिच्या गोड आणि प्रभावी अभिनयासाठी ओळखली जाते, तर सारंगने नेहमीच वेगळ्या भूमिकांद्वारे प्रेक्षकांवर ठसा उमटवला आहे. त्यामुळे ‘आली मोठी शहाणी’त दोघांची जोडी नेमकी कोणत्या कथानकातून झळकणार, याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणाले, “ नुकतीच चित्रीकरणाला सुरुवात झाली असून प्रेक्षकांसाठी एक वेगळं आणि मनोरंजक कथानक घेऊन आम्ही येत आहोत. हृता आणि सारंगची जोडी नक्कीच सर्वांना आवडेल, याची मला खात्री आहे. संपूर्ण टीम या प्रवासासाठी खूप उत्सुक आहे.”
चित्रपटाचं शीर्षक ‘आली मोठी शहाणी’ जितकं आकर्षक, तितकंच ते कथानकाबद्दल कुतूहल निर्माण करणारं आहे. आता या हटके शीर्षकाखाली नेमकं काय घडणार आणि हृता-सारंगची जोडी प्रेक्षकांच्या मनात किती शहाणी ठरणार, हे पाहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे! दरम्यान, या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन आनंद दिलीप गोखले यांनी केलं आहे. ‘फाईन ब्रू प्रॉडक्शन्स’ प्रस्तुत आणि ‘ट्रू होप फिल्म वर्क्स’च्या सहयोगाने प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटाचे निर्माते जयकुमार मुनोत, ईशा मूठे आणि श्रुती साठे आहेत.
By Sunder M
