पद्मश्री अशोक सराफ आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या हस्ते “मॅजिक” चित्रपटाचा टीजर लाँच
“मॅजिक” १ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला
अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरवला गेलेला “मॅजिक” हा चित्रपट १ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. एन्काऊंटर स्पेशलिस्ट असलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या आयुष्यात घडणाऱ्या उलथापालथींची एक रंजक गोष्ट “मॅजिक” चित्रपटात दाखविण्यात आली आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर मराठी सिनेसृष्टीचे महानायक पद्मश्री अशोक सराफ आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला.
तुतरी व्हेेंचर्स या निर्मिती संस्थेच्या राजू सत्यम यांनी याआधी बॉलीवूड, तमिळ चित्रपटांची निर्मिती केली असून “मॅजिक” या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी सिनेसृष्टीत निर्माता म्हणून पाऊल टाकले आहे. रवींद्र विजया करमरकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. योगेश विनायक जोशी, रवींद्र विजया करमरकर यांनी कथालेखन, तर योगेश विनायक जोशी, अभिषेक देशमुख यांनी पटकथा आणि संवाद लेखन केलं आहे. केदार फडके यांनी छायांकन, देवेंद्र भोमे, चिनार-महेश यांनी संगीत, महेश कुडाळकर यांनी कला दिग्दर्शकाची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात जितेंद्र जोशी एन्काउंटर स्पेशलिस्टच्या प्रमुख भूमिकेत असून, सिद्धीरुपा करमरकर, जुई भागवत, प्रियांका पालकर, मयूर खांडगे, अभिजित झुंजारराव, रुपा मांगले, नितीन भजन, गुरुराज कुलकर्णी, योगेश केळकर, प्रदीप डोईफोडे, रसिकराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
“मॅजिक” चित्रपटाच्या टीजरमध्ये पोलिस स्टेशनमध्ये आपल्याच विचारांत गर्क असलेला जितेंद्र जोशी आपल्याला दिसतो. त्यानंतर त्याच्यासमोर एक मुलगी येते, पण ती त्याला धूसर दिसते असा हा टीजर आहे. मात्र, या दरम्यान त्याच्या मनातली घालमेल , भावभावना चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतात. पार्श्वसंगीत म्हणून वापर केलेली घड्याळाची टिकटिक अंगावर काटा आणते. त्यामुळे हा टीजर प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतो. “मॅजिक” दरवळणारं मायाजाल आता दिवसागणिक आपल्या अधिकाधिक जवळ येतंय. उत्तम स्टारकास्ट, रंजक कथानक असलेला “मॅजिक” मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी १ जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

By Sunder M
