EntertainmentMarathi

हेमंत ढोमे यांच्या शाळेत पार पडला ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चा संगीत अनावरण सोहळा

रत्नाकर मतकरींचं ‘स्वर्गात आकाशगंगा’ नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला!

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटातील पहिलं गाणं ‘शाळा मराठी’ला प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता दुसरं गीत ‘स्वर्गात आकाशगंगा’ हे शाळेतल्या आठवणींना उजाळा देणारं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याचा अनावरण सोहळा अगदी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने अभिनव ज्ञानमंदिर प्रशालेतील पटांगणात पार पडला. या शाळेत गाण्याचं अनावरण करण्याचं कारण म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचं या शाळेशी असलेलं अतूट आणि गोड नातं. त्यांच्या विद्यार्थीदशेतील अनेक आठवणी या शाळेशी जोडल्या असून हेमंत यांनी पहिल्यांदा नाटकात काम केलं ते याच शाळेच्या मंचावर. त्यामुळे त्यांच्यासाठी हा एक जिव्हाळ्याचा सोहळा असून शाळेला दिलेली एक मानवंदना आहे. यावेळी क्षिती जोग, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर, कादंबरी कदम यांच्यासह गायक रोहित राऊत, जुईली जोगळेकर, संगीतकार हर्ष- विजय उपस्थित होते.

YouTube player

या खास सोहळ्यात चित्रपटातील कलाकार हजारो विद्यार्थ्यांसोबत गाण्यावर थिरकले. विद्यार्थ्यांची ऊर्जा आणि मैदानात दुमदुमलेलं आनंदी वातावरण यामुळे हा गाण्याचा अनावरण सोहळा धमाकेदार ठरला. शिक्षक, विद्यार्थी आणि चित्रपटाची टीम सगळ्यांनी मिळून हा क्षण संस्मरणीय बनवला.

सुप्रसिद्ध साहित्यिक स्व. रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेलं हे कालातीत गीत आजही प्रत्येक शाळकरी विद्यार्थ्याच्या मनात घर करून आहे. संगीतकार हर्ष-विजय यांनी या लोकप्रिय गाण्याला आधुनिक आणि नॉस्टॅल्जिक असा सुंदर स्पर्श देत नव्याने सादर केलं आहे. गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांच्या आवाजातील मधुर भावस्पर्शी गोडवा या गाण्याला आणखी मोहक करतो.

दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले, ” वडिलांच्या पोलीस खात्यातील नोकरीमुळे माझे पाचवी ते सातवी पर्यंतचे शिक्षण याच शाळेत झाले. आज सिनेक्षेत्रात काम करताना तो दिवस आठवतो, जेव्हा मी पहिल्यांदा नाटकात काम केलं, जे आपल्या शाळेच्या मंचावर होतं. दिवंगत परांजपे सरांनी हाताला धरून मला त्या मंचावर उभं केलं होतं. सरांचे आणि शाळेचे हे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. मी कायमचा त्यांचा ऋणी असेन. आपल्या शाळेसाठी काही करावे, माझी शाळा कुठली, हे अभिमानानं सांगावं, असं कायमच वाटायचं आणि या चित्रपटाच्या निमित्तानं ही संधी मला मिळाली. माझ्या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा याच शाळेत करण्याची माझी इच्छा पूर्ण केल्याबद्दल मी शाळेचा मनापासून आभारी आहे. ”

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ १ जानेवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटात दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत दिसणार असून, त्यांच्यासोबत अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर आणि मराठी चित्रपटात पहिल्यांदाच पदार्पण करणारी प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट झळकणार आहे.

चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांचे असून, क्षिती जोग निर्माती आहे. तर सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत.

 

 

By Sunder

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *