‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’च्या टीमने राबवले नाशिकच्या शाळेत स्वच्छता अभियान
संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त चित्रपटाच्या टीमचा खास उपक्रम
मराठी शाळा, मातृभाषा आणि संस्कारांची जपणूक यांचा मुद्दा प्रभावीपणे मांडणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. वेगळ्या धाटणीचे प्रमोशन करत या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकतेची लाट निर्माण केली आहे. आजच्या काळात झपाट्याने कमी होत चाललेली मराठी शाळांची संख्या, मातृभाषेचं महत्त्व आणि शिक्षणव्यवस्थेतील बदल यावर भाष्य करणारा हा चित्रपट येत्या १ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


याच सामाजिक आणि सांस्कृतिक जाणिवेचा पुढचा टप्पा म्हणून चित्रपटाच्या टीमने आणखी एक अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे. संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाशिक येथील राणी लक्ष्मीबाई प्राथमिक विद्या मंदिर या शाळेत चित्रपटाच्या टीमकडून स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले. ही शाळा बेसमेंट एरियामध्ये असून सर्व महिला शिक्षक व सफाई कर्मचारी यांनी मिळून ही शाळा सुरू केली आहे. स्वच्छतेतून समाजजागृती करणाऱ्या संत गाडगेबाबांच्या विचारांना अभिवादन करत, या अभियानातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या स्वच्छता अभियानात चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्यासह निर्मात्या क्षिती जोग व प्राजक्ता कोळी, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, हरीश दुधाडे आणि पुष्कराज चिरपुटकर हे कलाकार प्रत्यक्ष सहभागी झाले होते. कलाकार आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाळेचा परिसर स्वच्छ केला. तसेच शाळेच्या भिंती ही रंगवल्या. भिंतींवर विविध रंगसंगतीतून साकारलेल्या चित्रकलेमुळे शाळेचे रूप अधिक खुलले. स्वच्छता अभियानानंतर कलाकारांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला, दिलखुलास गप्पा मारल्या. यानंतर कलाकारांनी विद्यार्थ्यांसोबत बसून जेवणाचाही आस्वाद घेतला. या सगळ्या क्षणांमुळे विद्यार्थ्यांसाठी हा दिवस अविस्मरणीय ठरला.

दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “शाळा म्हणजे फक्त अभ्यासाची जागा नाही, तर आयुष्य घडवणारी संस्कारांची शाळा आहे. संत गाडगेबाबांनी स्वच्छतेच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली. त्यांच्या पुण्यतिथीला विद्यार्थ्यांसोबत स्वच्छता अभियान राबवताना मनापासून समाधान वाटते. ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपटही हाच विचार मांडतो. आपली भाषा, आपली शाळा आणि आपले संस्कार जपणे आज खूप गरजेचे आहे. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाल्यास या शाळेसाठी देणगी स्वरूपात एक रक्कम आमच्याकडून दिली जाईल.”

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटात दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत दिसणार असून, त्यांच्यासोबत अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर, निर्मिती सावंत आणि मराठी चित्रपटात पहिल्यांदाच पदार्पण करणारी प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट झळकणार आहे.
चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांचे असून, क्षिती जोग निर्माती आहे. तर सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत.
By Sunder
