मराठी सिनेसृष्टीला मिळाली नवीन जोडी! अभिजीत आमकर- प्रियदर्शिनी इंदलकर प्रथमच एकत्र
टेलिव्हिजनचे कलाकार मोठ्या पडद्यावर झळकणार एकत्र !
टेलिव्हिजनच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले चेहरे म्हणजे अभिजीत आमकर आणि प्रियदर्शिनी इंदलकर. दोघांनीही आपल्या अभिनयाची छाप अवघ्या महाराष्ट्रावर सोडली आहे. हेच चेहरे आता पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकण्याची सज्ज झाले आहेत. अक्षय गोरे दिग्दर्शित ‘लग्नाचा शॉट’ या चित्रपटातून ते एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
प्रियदर्शिनी हिने यापूर्वी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये नामांकित कलाकारांसोबत काम केले आहे, मात्र या चित्रपटात ती पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर प्रसिद्धी मिळवलेल्या अभिनेत्यासोबत झळकणार आहे. या दोघांच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीला एक फ्रेश जोडी मिळणार आहे.
प्रियदर्शिनी इंदलकर म्हणते, ‘’अशा प्रकारचा रोमँटिक चित्रपट मी पहिल्यांदाच करतेय. या चित्रपटात आमचं एक रोमॅंटिक गाणंही आहे, जे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून पडद्यावर अशा पद्धतीचा रोमान्स मी पहिल्यांदाच साकारत आहे. अभिजीतसोबत काम करताना मला खूपच सहजता वाटली. तो अत्यंत शिस्तबद्ध असून चित्रीकरणाच्या ठिकाणी सगळं अतिशय संयमानं हाताळतो. सहकलाकाराची काळजी घेण्यापासून ते चित्रीकरणावेळी काय योग्य आहे आणि काय टाळावं, याबाबत तो काटेकोर आहे. चित्रपटासाठी एकत्र काम करण्यापूर्वी आमची ओळख नव्हती, मात्र या निमित्ताने अभिजीतशी छान ओळख निर्माण झाली. मी स्वतः तालमींवर भर देणारी कलाकार असल्यामुळे अनेकदा ‘एकदा पुन्हा सीन करूया’ असं सुचवायचे आणि त्याने त्यासाठी नेहमीच मनापासून साथ दिली. त्यामुळे संपूर्ण चित्रीकरणादरम्यान एक सुरक्षित आणि सहज वातावरण तयार झालं. एकंदरच अभिजीतसोबत काम करण्याचा अनुभव अतिशय समाधानकारक आणि संस्मरणीय ठरला.’’
अभिजीत आमकर म्हणतो, ‘’माझा अभिनयाचा प्रवास रंगभूमीपासून सुरू झाला आणि आज मी विविध माध्यमांतून काम करत आहे. या सगळ्या प्रवासात प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. आता माझा हा चित्रपट प्रदर्शित होत असताना एक वेगळाच आनंद आणि समाधान वाटत आहे. पडदा लहान असो वा मोठा, मेहनत मात्र तितकीच असते आणि त्याच प्रामाणिकपणे मी या चित्रपटासाठीही काम केलं आहे. आतापर्यंत मिळालेलं प्रेम या चित्रपटातूनही मिळेल, अशी मनापासून आशा आहे. प्रियदर्शिनीसोबत काम करण्याचा अनुभव अतिशय चांगला होता. ती कामाबाबत अत्यंत एकाग्र आहे आणि तिची स्वतःची एक वेगळी शैली आहे. या चित्रपटात आमची ओळख नसलेल्या दोन व्यक्तींची गोष्ट असल्यामुळे आमच्यातली ही केमिस्ट्री महत्त्वाची होती आणि ती छान जमली. चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत काम करताना एक सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळाली.”
महापर्व फिल्म्स आणि जिजा फिल्म कंपनी प्रस्तुत‘लग्नाचा शॉट’ या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन अक्षय गोरे यांनी केले आहे. गीत, संगीताची धुरा प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी सांभाळली आहे. तर अक्षय महादेव गोरे, विजय महादेव गोरे, अभिषेक उत्कर्ष कोळी, सुरेश मगनलाल प्रजापती या चित्रपटाचे निर्माते आहेत. ६ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
