कुरळे ब्रदर्सचा ‘नो लेडीज, नो मॅरेज’, नियम मोडायला ‘ती’ आलीये
कुरळे ब्रदर्ससाठी आयुष्य म्हणजे नियम, शिस्त आणि एक ठाम तत्त्व – ‘नो लेडीज, नो मॅरेज’.
ज्यांच्या आयुष्यात स्त्रियांना अजिबात स्थान नाही त्यांच्या आयुष्यात जर एका स्त्रीची एंट्री झाली तर? ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये असंच काहीस पाहायला मिळतंय. रतन, मदन, चंदन व बबन यांच्या आयुष्यात कामिनीची एंट्री झाली आहे. यांच्या आयुष्यात कामिनीच्या येण्याने काय घडेल, हे पाहाणे अतिशय रंजक ठरणार आहे. कामिनीच्या येण्याने उडणारी तारांबळ, गोंधळ आणि विनोद यांची धमाल झलक टीझरमध्ये दिसतेय.
कामिनीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरू या चित्रपटातून कुरळे ब्रदर्सच्या गँगमध्ये सामील झाली आहे. शिस्तप्रिय भावंडांमध्ये बिनधास्त कामिनीची एंट्री होणं म्हणजे डबल गोंधळ, डबल विनोद! कठोर स्वभावाचा रतन, विनोदी मदन, निरागस स्वभाव असलेला चंदन या भिन्न स्वभावांच्या भावांसोबत आणि खट्याळ बबन बरोबर तिची केमिस्ट्री कशी जमेल? हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.
रिंकू राजगुरू म्हणते, “ ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’सारख्या मोठ्या आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान असलेल्या चित्रपटाच्या सीक्वेलचा भाग होणं हे माझ्यासाठी खूप खास आहे. अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक अंकुश चौधरी यांच्यासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळालं.”
सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रस्तुत, उषा काकडे प्रॉडक्शन्स, ईओडी. मीडिया उदाहरणार्थ निर्मित आणि अमेय विनोद खोपकर पिक्चर्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरी यांनी केले आहे. तसेच उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन हे निर्माते आहेत. मोहसिन खान, यशराज टिळेकर, सौरभ ललवाणी आणि धनविक एंटरटेनमेंट सहनिर्माते असून स्मिथ पीटर तेलगोटे सहायक निर्माता आहेत.

अंकुश चौधरी यांची कथा, संदीप दंडवते यांची पटकथा व संवाद लाभलेल्या या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संकेत पाठक, संजय नार्वेकर आणि समृद्धी केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार संजय जाधव यांनी केले आहे. येत्या ३० जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
By Sunder
