वकील बनून सत्यासाठी लढणार राजसी भावे
विविध चित्रपट आणि नाटकांमधून लक्षवेधी भूमिका साकारणारी युवा अभिनेत्री राजसी भावे आता वकील बनून सत्यासाठी लढणार आहे. तिचा हा लढा नेमका कशासाठी आणि कोणासाठी आहे? हे जाणून घ्यायचं असेल तर जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणारा ‘केस नं. ७३’ हा चित्रपट पहावा लागेल.
आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना राजसी सांगते, ‘अतिशय प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ क्रिमिनल वकिलाची ही भूमिका आहे. मधुरा इनामदार असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून तिच्या येण्याने ‘केस नं. ७३’ गुंता कसा सुटणार? हे पहाणं रंजक असणार आहे. सातत्याने होणाऱ्या काही हत्यांच सत्रनाट्य कोर्टापर्यंत येऊन पोहोचलं आहे. याची उकल एक तडफदार वकील म्हणून करताना यात माझ्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे कंगोरे पहायला मिळणार आहेत. वकिलांची देहबोली, त्यांचे व्यक्तिमत्व याच्या निरीक्षणातून ही भूमिका साकारण्याचा प्रयत्न मी केला आहे.
लायलॅक मोशन पिक्चर्स आणि डस्क स्टुडिओज निर्मित ‘केस नं. ७३’ हा मराठी चित्रपट नवीन वर्षात जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती शर्वरी सतीश वटक, डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केली आहे. सहनिर्माते प्रविण अरुण खंगार आहेत. अशोक शिंदे, राजसी भावे, शैलेश दातार, नंदिता पाटकर, पियुष आपटे अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाची पटकथा डॉ. ऋचा अमित येनुरकर यांची आहे. मंदार चोळकर यांनी चित्रपटाची गीते लिहिली असून संगीत आणि पार्शवसंगीताची जबाबदारी अमेय मोहन कडू यांनी सांभाळली आहे. छायांकन निनाद गोसावी यांचे आहे.
By Sunder
