EntertainmentMarathi

ही माझी पहिलीच अ‍ॅक्शन वेब सीरिज आहे” नेटफ्लिक्सच्या ” तस्करी” बद्दल पहा काय म्हणाली अमृता खानविलकर !

जिने आजवर वैविध्यपूर्ण माध्यमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं अशी बहुगुणी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर ! नव्या वर्षाची सुरुवात अमृताने एकदम दमदार पद्धतीने करत असून तिच्या बहुप्रतीक्षित वेब सीरिज “तस्करी” चा प्रभावी ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. “तस्करी” 14 जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून ही एक थरारक अ‍ॅक्शन पॅक सीरिज आहे. या सीरिज मध्ये बॉलिवूडचा बिग स्टार इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार असून सुप्रसिद्ध दिग्दर्शक नीरज पांडे यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे.

तस्करी बद्दल बोलताना अमृता सांगते “तस्करी” चा प्रवास माझ्यासाठी खूप खास ठरला आहे. माझ्यासाठी 2025 ची सुरुवात देखील धमाकेदार होती कारण मागील वर्षी जानेवारीमध्येच मी तस्करीच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आणि २०२६ या नव्या वर्षाची सुरुवात तिच्या रिलीज ने होणार आहे याहून नवीन वर्षाची काय सुंदर सुरुवात होऊ शकते ! तस्करीचा संपूर्ण अनुभव माझ्यासाठी खूप जास्त अविस्मरणीय ठरला. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी मला ऑडिशनही द्यावं लागलं नाही. कास्टिंग डायरेक्टर विकी सदानाह यांच्या माध्यमातून माझी नीरज सरांशी भेट झाली मी एक सीन सादर केला आणि त्यांना तो खूप आवडला आणि तिथेच तस्करीची गोष्ट पक्की झाली”

अमृता सारखी बहुआयामी अभिनेत्री चित्रीकरणाच्या विशेष अनुभवाबद्दल सांगताना म्हणाली “ही सीरिज माझ्या कारकिर्दीतील पहिलीच अ‍ॅक्शन वेब सीरिज आहे आणि म्हणून माझ्या संपूर्ण प्रवासातला हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या सीरिजमध्ये मी भरपूर अ‍ॅक्शन सीन केले आहेत. माझी व्यक्तिरेखा ‘मिताली’ ही असून खूपच स्ट्रॉंग आणि कस्टम्स टीममधील मी एक महत्त्वाची सदस्य आहे. मितालीच्या भूमिकेत शिरून स्वतःचा हा नवा पैलू अनुभवताना मला खूप आनंद झाला आणि यातून एक नवी अमृता मला गवसली”

नीरज पांडे यांच्या दिग्दर्शनाखाली काम करणं हा अमृतासाठी एक शिकण्याचा अनुभव ठरला अस देखील ती सांगते.
नीरज सर एखादा सीन ज्या पद्धतीने विचारात घेतात आणि साकारतात ते अप्रतिम आहे. त्यांच्या सेटवर प्रत्येक क्षण वेगवान आणि ऊर्जेने भरलेला असतो. पुढे काय होणार याची कलाकारांना कायमच उत्सुकता असते. जणू थिएटर करत असल्यासारखं वाटतं लांब टेक्स, अनेक हालचाली आणि एका फ्रेममध्ये अनेक कलाकार. मोठ्या जमावाचे दृश्य हाताळण्यात ते खरोखरच तरबेज आहेत,” अस अमृता सांगते.

२०२६ वर्षाची दिमाखदार सुरुवात करताना विशेष बाब म्हणजे अमृताचा नेटफ्लिक्स सोबत हा पहिला वहिला प्रोजेक्ट आहे. या स्वप्नवत संधी बद्दल बोलताना अमृता म्हणाली “नेटफ्लिक्स सारखा प्लॅटफॉर्म आणि नीरज पांडे यांच्यासारखे निर्माते हा दुहेरी योग जुळून आला आणि अशा प्रोजेक्टसोबत वर्षाची सुरुवात होणं खूप खास वाटतंय. मला नेहमीच नेटफ्लिक्ससोबत काम करायचं होतं आणि तेही नीरज पांडे यांच्या दिग्दर्शनाखाली म्हणजे सोने पे सुहागा! मुंबई विमानतळावर शूटिंग करणं आणि संपूर्ण यंत्रणा प्रत्यक्ष काम करताना पाहणं हा स्वतःतच एक विलक्षण अनुभव होता”

14 जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या “तस्करी” सोबतीने अमृता 23 जानेवारीपासून डिस्नी हॉटस्टारवरील ‘स्पेस जेन – चंद्रयान’ या आगामी प्रोजेक्टमध्येही झळकणार आहे.

https://www.instagram.com/reel/DTNRZ9eAM–/?igsh=MW5udmJxcms5OHQ1eA==

 

 

By Sunder

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *