EntertainmentMarathi

लग्नाच्या गडबडीत अडकले अभि – कृतिका ‘लग्नाचा शॉट’चा धमाल ट्रेलर प्रदर्शित

लग्न म्हणजे आनंद, गडबड, नात्यांची गुंफण आणि अनेक अनपेक्षित क्षणांचा संगम आणि हाच संगम मोठ्या पडद्यावर मांडण्यासाठी येत आहे आगामी मराठी चित्रपट ‘लग्नाचा शॉट’. या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच एका खास आणि हटके वातावरणात प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर लॉन्चचा हा सोहळा चक्क खऱ्या लग्नघरासारखा साकारण्यात आला होता, ज्यामुळे उपस्थितांना हा केवळ ट्रेलर लॉन्च न वाटता जणू प्रत्यक्ष लग्नसमारंभाचाच अनुभव मिळाला.

यावेळी ढोल ताशांच्या गजरात अभिजीत आमकर याची घोड्यावरून वरात आली तर वाजतगाजत प्रियदर्शिनी इंदलकर पालखीतून आली. या खास सोहळ्याला लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी यांची उपस्थिती लाभली, ज्यामुळे कार्यक्रमात विशेष रंगत आली. संपूर्ण वातावरणात लग्नाची लगबग, उत्साह आणि गोंधळ अनुभवायला मिळत होता, अगदी चित्रपटाच्या संकल्पनेप्रमाणेच.

ट्रेलरमध्ये एका लग्नाच्या तयारीपासून सुरू होणारी गोष्ट पुढे कशी अनपेक्षित वळणं घेते, याची रंजक झलक पाहायला मिळते. चुकीचे निर्णय, नात्यांमधील गैरसमज आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ हे सगळं अगदी हलक्याफुलक्या, विनोदी शैलीत प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे. अभि आणि कृतिकाच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या घटनांमुळे त्यांचा प्रवास वेगळ्याच दिशेने वळतो. या प्रवासात अनेक मजेशीर प्रसंगांसोबत काही भावनिक क्षणही पाहायला मिळतात.

YouTube player

दिग्दर्शक अक्षय गोरे म्हणतात, ’’लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा सोहळा असतो. त्या एका दिवसासाठी अनेक स्वप्नं, अपेक्षा आणि भावना गुंफलेल्या असतात. पण अनेकदा या आनंदाच्या क्षणांमध्ये काही अनपेक्षित गोष्टी घडतात आणि संपूर्ण आयुष्याला वेगळं वळण मिळतं. ‘लग्नाचा शॉट’ची कथा अशाच अनपेक्षित प्रसंगांमधून आकाराला आली आहे. या चित्रपटातून आम्ही नुसतं हसवणारं मनोरंजन न देता, नात्यांमधील गोंधळ, गैरसमज आणि त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रवास हलक्याफुलक्या पद्धतीने मांडला आहे. प्रेक्षकांनी थिएटरमध्ये येऊन या प्रवासाचा आनंद घ्यावा आणि स्वतःला या गोष्टींशी कुठेतरी जोडून घ्यावं, अशी माझी मनापासून इच्छा आहे.”

महापर्व फिल्म्स निर्मित आणि जिजा फिल्म कंपनी यांच्या सहयोगाने साकारलेल्या ‘लग्नाचा शॉट’ या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन अक्षय गोरे यांनी केले आहे. गीत-संगीताची धुरा प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी सांभाळली असून अक्षय महादेव गोरे, विजय महादेव गोरे, अभिषेक उत्कर्ष कोळी आणि सुरेश मगनलाल प्रजापती हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात प्रियदर्शिनी इंदलकर, अभिजीत आमकार, प्रभाकर मोरे, अभिजीत चव्हाण, राजन ताम्हाणे, लीना पंडित, संजय कुलकर्णी, विजय पवार, मनोहर जाधव, संजीवनी पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 

By Sunder

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *