EntertainmentMarathi

’पुन्हा एकदा साडे माडे तीन’चं धमाकेदार प्रमोशनल साँग चर्चेचा केंद्रबिंदू

कुरळे बंधू केमिस्ट्री म्हणजे नुसती गोष्ट नाही, तर धमाल, टोमणे, खट्याळपणा आणि मनमोकळा आनंद यांचा अखंड उत्सव! हाच उत्सव आता ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाच्या नव्या प्रमोशनल साँगमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझर आणि ट्रेलरला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर हे दमदार, निरागस शब्दांचं आणि जबरदस्त एनर्जीने ओतप्रोत भरलेलं हे प्रमोशनल साँग सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

YouTube player

अवधूत गुप्ते यांच्या खणखणीत आणि उत्स्फूर्त आवाजामुळे गाण्यात वेगळीच चैतन्याची लहर निर्माण झाली आहे. गौरव चाटी आणि आदित्य बेडेकर यांच्या संगीताने गाण्याला धमाल टच दिला असून विक्रांत हिरनाईक यांच्या साध्या, निरागस आणि मनाला भिडणाऱ्या शब्दांतून तीन भावांमधील घट्ट नातं, इनोसंट बॉण्डिंग आणि मस्तीदार केमिस्ट्री सुंदरपणे उलगडते. हे गाणं ऐकताना पाय थिरकतातच, आणि चेहऱ्यावर हसूही नकळत उमटतं, म्हणूनच हा ट्रॅक खऱ्या अर्थाने ‘फील गुड’ ठरतोय.

या प्रमोशनल साँग निर्मिती प्रक्रिया देखील तितकीच इंटरेस्टिंग आहे. चित्रपटाच्या कथेत गाण्यासाठी स्वतंत्र सीन नसल्यामुळे प्रमोशनल साँग करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, पहिलं गाणं अजय–अतुल यांचं असल्याने ते प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुळलं होतं. त्यामुळे त्या गाण्याच्या भावविश्वाशी सुसंगत असं, तरीही वेगळ्या ढंगाचं आणि तितकंच आपलेपण जपणारं गाणं देण्याचा विचार करण्यात आला.

याबाबत दिग्दर्शक अंकुश चौधरी म्हणतो, “चित्रपटात गाणं बसवता येईल, असा सीन नव्हता, म्हणून प्रमोशनल गाण्याचा विचार केला. पहिलं गाणं प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण करून गेलं होतं. त्यामुळे त्याच भावनेला पुढे नेणारं, तरीही वेगळ्या मांडणीचं काहीतरी करायचं होतं. अजय–अतुल यांच्याशी चर्चा झाली, मात्र त्यांच्या इतर कमिटमेंटमुळे ते शक्य झालं नाही. एका सेशनदरम्यान चित्रपटातील एक बॅकग्राऊंड ट्यून आठवली आणि त्याच बेसवर जबरदस्त गाणं तयार करण्याची कल्पना सुचली. यावेळी रोमँटिक झोनऐवजी निरागस, इनोसंट आणि पूर्णपणे तीन भावांभोवती फिरणारं गाणं करायचं ठरवलं.”

टीझर, ट्रेलरनंतर आता प्रमोशनल साँगने ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ची उत्सुकता शिखरावर नेली आहे. तीन भावांचा हा धमाकेदार, निरागस आणि मनमोकळा जल्लोष मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ येत्या ३० जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

या चित्रपटात भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव आणि रिंकू राजगुरू यांच्या प्रमुख भूमिका असून संजय नार्वेकर यात पाहुणे कलाकार म्हणून झळकणार आहेत. सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रस्तुत, उषा काकडे प्रॉडक्शन्स, ईओडी. मीडिया उदाहरणार्थ निर्मित आणि अमेय विनोद खोपकर पिक्चर्स यांच्या सहकार्याने साकारलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अंकुश चौधरी यांनी केलं आहे. उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन हे निर्माते असून मोहसिन खान, यशराज टिळेकर, सौरभ ललवाणी आणि धनविक एंटरटेनमेंट सहनिर्माते आहेत. यापूर्वीही एव्हीके पिक्चर्सने अनेक मनोरंजनात्मक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणले आहेत. यापुढेही ते असेच जबरदस्त चित्रपट घेऊन येतील.

 

 

By Sunder

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *