“मन आतले मनातले” चित्रपट १३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला
अनेक मराठी, हिंदी, दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेले अभिनेते उपेंद्र लिमये आता दमदार खलनायकी भूमिकेत दिसणार आहेत. मन आतले मनातले या चित्रपटात त्यांनी खलनायकी भूमिका साकारली असून, या अॅक्शनपॅक्ड चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. १३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सूर्य फिल्म वर्ल्ड प्रस्तुत “मन आतले मनातले” या चित्रपटाची निर्मिती सुरेन महापात्रा यांनी केली आहे. सुरेन महापात्रा यांनी चित्रपटाचं कथा आणि पटकथा लेखन, तर संवादलेखन मनोज सुधाकर येऊनकर यांनी केले आहे. तर जेम्स अँथनी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. अभिजित मजुमदार यांनी संगीत दिग्दर्शन, डॉ. सुनंदा डिवरे पळवणकर यांनी गीतलेखन केलं आहे. सुदर्शन सेनापती यांनी छायांकन, मलया आणि बिपिन यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात सुरेन, मानसी नाईक, उपेंद्र लिमये, ऋतुराज फडके, संदीप गायकवाड, कमलेशन सावंत, अरूण नलावडे, यतीन कार्येकर, सिया पाटील, राजेश आहेर, विनित भोंडे अशी तगडी स्टारकास्ट आहे. सूर्य फिल्म वर्ल्ड या निर्मिती संस्थेने आजवर ओडिया, हिंदी, तेलुगू, तमिळ, बंगाली भाषांतील चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता मन आतले मनातले या चित्रपटातून ही निर्मिती संस्था मराठीमध्ये पदार्पण करत आहे.
थॅलेसेमिया, गिल्बर्ड सिंड्रोम या आजारावर औषध शोधण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या एका डॉक्टर दांपत्याला औषधाचा शोध लागतो. या आजारांना त्यांचा मुलगाही तोंड देत असतो. शोध लागलेल्या औषधाचा प्रयोग ते आपल्या मुलावर करतात. पण त्या औषधाचा परिणाम नक्की कसा होतो त्यानंतर वेगवेगळी वळणे घेत कथेत अनेक नाट्यमय घडामोडी घडतात. त्या मुलाचे नेमके काय होते याचे उत्तर चित्रपटात पहायला मिळणार आहे.
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेते उपेंद्र लिमये यांनी प्रत्येक भूमिकेत खणखणीत अभिनय करून मराठी, हिंदी, दाक्षिणत्य चित्रपटात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मन आतले मनातले हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतला वेगळा चित्रपट ठरणार आहे. त्यांची खलनायकी भूमिका हे चित्रपटाचं महत्त्वाचं आकर्षण ठरणार आहे. चित्रपटाच्या टीजरमध्येही उत्तम अॅक्शन सिक्वेन्स दिसत असून, या टीजरमुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता नक्कीच वाढली आहे.

By Sunder
