EntertainmentMarathi

अंकुश चौधरीच्या वाढदिवसानिमित्त ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

३० जानेवारी रोजी प्रदर्शित होणारा ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट आता पुन्हा एकदा तेवढ्याच जोशाने आणि तेवढीच धमाल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट आता १३ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असून, दिग्दर्शक अंकुश चौधरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे थोड्या प्रतीक्षेनंतर, लवकरच कुरळे बंधूंची धमाल आणि गोंधळ प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट रतन, मदन, चंदन आणि बबन या वेगवेगळ्या स्वभावांच्या चार जणांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोंधळाची, गैरसमजांची आणि अनपेक्षित वळणांची धमाल सांगणार आहे. सतत बिघडत जाणारी परिस्थिती, छोट्या गोष्टींमधून मोठा गोंधळ आणि त्यातून निर्माण होणारा विनोद हा या कथेचा केंद्रबिंदू आहे. या सगळ्या गोंधळात रिंकू राजगुरूची एन्ट्री त्यांच्या आयुष्यात एक वेगळंच वळण घेऊन येणार आहे. ती या चौघांच्या आयुष्यात का आली आणि तिच्या येण्याने सगळ्यांची गडबड का उडाली, याची उत्तरं चित्रपट पाहूनच मिळणार आहेत. या सगळ्यात बबनचा खोडकरपणा, मदनचा विनोदी अंदाज, चंदनची निरागसता आणि रतनचा ताठर स्वभाव प्रेक्षकांना पुन्हा एकदा प्रेमात पाडणार आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अमेय विनोद खोपकर पिक्चर्सचे अमेय खोपकर म्हणतात, ”माननीय अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती. हा आघात अत्यंत वेदनादायी असून, या दुःखात आम्हीही सहभागी आहोत. अशा काळात कोणत्याही प्रकारचा आनंदोत्सव साजरा करणे आम्हाला योग्य वाटले नाही. त्यामुळे संवेदनशीलतेची जाणीव ठेवत आम्ही ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. तसेच इतर चित्रपटांच्या प्रदर्शनावर कोणताही परिणाम होऊ नये, याचीही काळजी घेत आम्ही हा चित्रपट १३ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित करत आहोत. संवेदनशीलतेला प्राधान्य देत घेतलेला हा निर्णय प्रेक्षकांकडूनही समजून घेतला जाईल, असा विश्वास आहे.”

या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, आणि रिंकू राजगुरू यांच्या प्रमुख भूमिका असून संजय नार्वेकर यात पाहुणे कलाकार म्हणून झळकणार आहेत. सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रस्तुत, उषा काकडे प्रॉडक्शन्स, ईओडी. मीडिया उदाहरणार्थ निर्मित आणि अमेय विनोद खोपकर पिक्चर्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरी यांनी केले आहे. तसेच उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन हे निर्माते आहेत. मोहसिन खान, यशराज टिळेकर, सौरभ ललवाणी आणि धनविक एंटरटेनमेंट सहनिर्माते असून स्मिथ पीटर तेलगोटे सहायक निर्माता आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार संजय जाधव यांनी केले आहे.

 

By Sunder

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *