EntertainmentMarathi

‘पिफ्फ’मध्ये तिहेरी सन्मान पटकावलेला ‘बाप्या’ १५ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

‘पिफ्फ’मध्ये तिहेरी सन्मान पटकावलेला ‘बाप्या’ १५ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवलेला आणि अनोख्या संकल्पनेमुळे चर्चेत असलेला ‘बाप्या’ हा आगळावेगळा मराठी चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. ‘’आपली यारी… गावावर भारी!’’ अशी हटके टॅगलाईन असलेला हा चित्रपट १५ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. वर्किंग आय फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे नुकतेच प्रदर्शित झालेले पोस्टर सध्या सोशल मीडियावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे आणि या वेगळ्या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढवत आहे.

पोस्टरमध्ये पाठमोरी उभी असलेली व्यक्ती आणि तिला पाहून गावातील इतर पात्रांच्या चेहऱ्यावर उमटलेले आश्चर्य, कुतूहल आणि प्रश्नार्थक भाव अनेक प्रश्न निर्माण करतात. विशेष म्हणजे पोस्टरमधील ती पाठमोरी व्यक्ती म्हणजे अभिनेत्री राजश्री देशपांडे असल्याचे कळतेय. पण ती अशी का उभी आहे? तिच्या आगमनाने गावात एवढे आश्चर्य का निर्माण होते? आणि तिच्या येण्याने नेमके काय बदल घडणार आहेत?

या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप गूढ ठेवण्यात आली असून, चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढवण्यात आली आहे. मैत्री आणि नातेसंबंधांभोवती फिरणाऱ्या या वेगळ्या कथेत नेमके काय घडते, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपटाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ‘आपली यारी… गावावर भारी!’ ही ओळही या चित्रपटातील मैत्रीची ताकद आणि त्यातून घडणाऱ्या रंजक घटनांची झलक देते.

या अनोख्या आणि हटके संकल्पनेवर आधारित चित्रपटात प्रतिभावान अभिनेता गिरीश कुलकर्णी झळकणार असून त्यांच्यासह राजश्री देशपांडे, देविका दफ्तरदार, श्रीकांत यादव आणि आर्यन मेंगजी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. पोस्टरमुळेच चित्रपटाची कथा नेमकी काय असेल, या बाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

समीर तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला ‘बाप्या’ हा चित्रपट मनोरंजनासोबतच आशयघन आणि वेगळ्या धाटणीच्या कथानकामुळे विशेष ठरणार आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने मोठे यश मिळवत पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (PIFF) मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असे तीन मानाचे पुरस्कार पटकावले आहेत. या तिहेरी सन्मानामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

दिग्दर्शक समीर तिवारी म्हणतात, ‘’हा चित्रपट मैत्री, नाती आणि त्यातून घडणाऱ्या रंजक प्रसंगांची एक वेगळी आणि अनोखी कथा आहे. प्रेक्षकांना हसवत-खेळवत एक वेगळा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘आपली यारी… गावावर भारी!’ ही ओळ या चित्रपटाचा आत्माच आहे.’’

वर्किंग आय फिल्म्स प्रस्तुत ‘बाप्या’ चित्रपटाचे दिग्दर्शन समीर तिवारी यांनी केले असून मुत्कल तेलंग आणि समीर तिवारी निर्माते आहेत.

राजश्री देशपांडेची ही रहस्यमय व्यक्तिरेखा नेमकी कशी आहे? तिच्या आगमनाने गावात असा खळबळजनक प्रतिसाद का उमटतो? आणि ‘आपली यारी… गावावर भारी!’ म्हणवणारी ही मैत्री नेमकी कोणती? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील दिवसांत समोर येतील, आणि त्याच वेळी या अनोख्या चित्रपटाचे आणखी काही पैलू उलगडत जातील.

 

 

By Sunder

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *