EntertainmentMarathi

धनंजय भावलेकर दिग्दर्शित ‘कर्मवीरायण’ १७ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात

धनंजय भावलेकर दिग्दर्शित ‘कर्मवीरायण’ १७ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात

महाराष्ट्राच्या खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब, गरजू, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र आता मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेते किशोर कदम यांनी कर्मवीरांची भूमिका साकारली असून, अनेक महोत्सवांमध्ये गौरवलेला हा चित्रपट आता १७ मे पासून महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. कर्मवीर अण्णांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग आणि घटना यांचा समावेश या चित्रपटात करण्यात आला आहे.

ट्रान्सएफएक्स स्टुडिओज प्रा. लि. यांनी निर्मिती केलेल्या “कर्मवीरायण” चित्रपटाची प्रस्तुती 7 वंडर्स चे पुष्कर मनोहर करत आहेत. धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अनिल सपकाळ आणि धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. किशोर कदम, सुहास शिरसाट, उपेंद्र लिमये, देविका दफ्तरदार, उषा नाईक अशा दिग्गज कलाकारांचा सशक्त अभिनय पाहायला मिळणार आहे. योगेश कोळी यांनी छायाचित्रण,संतोष गोठोस्कर यांनी संकलक म्हणून काम पाहिले आहे.

लहान वयातच महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रभाव पडलेल्या भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखून ग्रामीण भागात शिक्षण संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या काळात समाजात वर्चस्ववाद बोकाळला होता. त्यामुळे गरीब आणि बहुजनांची मुले शिक्षणापासून वंचित राहत होती. त्या मुलांनाही शिकण्याचा समान हक्क आहे असा भाऊराव पाटील यांचा ठाम विचार होता. त्या काळी अनेक लोकांनी भाऊरावांना विरोध केला. मात्र विरोधाला ज जुमानता शिक्षणाच्या प्रसाराचं कार्य सुरूच राहिलं आणि विविध शिक्षण संस्था उभ्या राहिल्या. शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थीही शिक्षणाकडे वळू लागले. त्यामुळेच ग्रामीण भागातील साक्षरतेचे प्रमाण वाढण्यास मदत झाली. महाराष्ट्राला शिक्षणाच्या मार्गावर नेणारे भाऊराव कर्मवीर झाले. शिक्षणासाठी धडपडणाऱ्या एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट आता चित्रपटाद्वारे पाहता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *