‘अलबत्या गलबत्या’ च्या विक्रमी प्रयोगांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद
‘अलबत्या गलबत्या’ च्या विक्रमी प्रयोगांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद
रंगभूमीवर धुमाकूळ घालत बच्चे कंपनीला घाबरवणारी आणि प्रसंगी हसवणारी ‘चिंची चेटकीण’ गुरुवारी १५ ऑगस्टला श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात तळ ठोकून होती. या चेटकिणीला भेटण्यासाठी छोट्यांसह मोठ्यांनाही तुडुंब गर्दी केली. रत्नाकर मतकरी लिखित तुफान लोकप्रियता मिळवणाऱ्या ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाने सलग ६ प्रयोग करत मराठी बालरंगभूमीच्या इतिहासात अनोखा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. या विक्रमाचे साक्षीदार होण्याची संधी अनेक नाट्यरसिकांनी आवर्जून घेतली.
नाटक पाहण्याच्या उत्सुकतेमुळे रसिकांनी सकाळी सात वाजताच्या प्रयोगालाही नाट्यगृह ‘हाउसफुल्ल’ केले. काही वेळातच बाल्कनीही गर्दीने भरली. या नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे कलाकारांचा उत्साह द्विगुणित झाला. ‘अलबत्या गलबत्या’ नाटक पाहण्यासाठी नाट्य रसिकांची गुरुवारी श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह यथे झुंबड उडाली. या नाटकाचे सलग प्रयोग प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरले. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते.
निर्माते राहुल भंडारे म्हणाले की ‘आजवर या नाटकाला नाट्यप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला, अपार प्रेम केलं. या नाटकाची लोकप्रियता आजही तितकीच आहे. विश्वविक्रमी प्रयोगाला रसिकांनी दिलेली दाद या नाटकाच्या लोकप्रियतेची प्रचिती देणारी आहे. या विक्रमी प्रयोगासाठी कलाकारांनी आणि पडद्यामागील तंत्रज्ञानी खूप मेहनत घेतली. नाटयरिसकांच्या प्रतिसादाने या कलाकारांच्या मेहनतीचे चीज झाले असल्याची भावना राहुल यांनी बोलून दाखविली.
शाळा सुटता, पुस्तक मिटता, करुया आपण गमत्या जमत्या..
अलबत्या गलबत्या….. अलबत्या गलबत्या….अलबत्या गलबत्या… अलबत्या.
असं म्हणत चिंची चेटकिणीची धमाल प्रेक्षकांना हसवत हसवत थरार, उत्सुकता आणि विनोदाची तिहेरी मेजवानी देते. चेटकीण झालेले निलेश गोपनारायण यांच्याबरोबरच सनीभूषण मुणगेकर, श्रद्धा हांडे आदि दहा कलाकारांची फौज आपल्या अफलातून उत्साहाने प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करते. या नाटकाचे दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर यांनी केले आहे.
By Sunder M