सुबोध भावे – तेजश्री प्रधानची केमिस्ट्री जुळणार? ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
सुबोध भावे – तेजश्री प्रधानची केमिस्ट्री जुळणार?
‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
शुभम फिल्म प्रोडक्शनच्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या आगामी सिनेमाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. २० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या सिनेमात पहिल्यांदाच सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. नुकत्याच झळकलेल्या या जबरदस्त टीझरमधून लग्न या विषयावर आधुनिक पिढीचा वेगळा दृष्टीकोन पाहायला मिळत आहे.
सिनेमाच्या टीझरमध्ये घरच्यांच्या सांगण्यानुसार दोन मध्यमवयीन ‘तरुण तरुणी’ लग्नासाठी ‘पाहाण्याच्या कार्यक्रमा’निमित्ताने भेटत आहेत. यावेळी ते एकमेकांच्या वयाचा अंदाज बांधताना दिसत आहेत. टीझरमधील संवाद मजेशीर असून प्रेक्षकांच्या मनात घर करणार आहेत. सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची केमिस्ट्री या टीझरमध्ये खुलून दिसत आहे. त्यामुळे आता थोडीशी लेट पण एकदम थेट सुरू झालेली ही सफर पाहायला मजा येणार आहे. यात सुबोध भावे, तेजश्री प्रधान यांच्यासह प्रदीप वेलणकर, मानसी मागिकर, संजय खापरे, शर्मिष्ठा राऊत यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन आनंद दिलीप गोखले यांनी केले असून, निर्माते शेखर विठ्ठल मते आहेत
चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात, “हा चित्रपट आजच्या काळातील लग्न आणि नातेसंबंधांच्या बदलत्या संकल्पनेवर आधारित आहे. आत्ताच्या पिढीच्या विचारसरणीत मोठा बदल झाला असून हाच विचार चित्रपटात मांडला आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल अशी आशा आहे.”
निर्माते शेखर विठ्ठल मते म्हणतात, ” हा चित्रपट आजच्या काळाचा असून तो संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहावा असा आहे. काळानुसार तरुणांची विचारसरणी बदलत चालली असून त्यामागे त्यांची काही ठोस कारणे आहेत. तरुणाईचे हेच विचार यात मांडण्यात आले आहे. आपल्यापैकी अनेकांना हा चित्रपट आपल्या जवळचा वाटेल.”