पुष्करच्या ‘डोक्याला शॉट’?
पुष्करच्या ‘डोक्याला शॉट’?
पुष्कर जोगने पहिल्यांदाच लिहिलेले ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ चित्रपटातील रॅप सॉंग प्रदर्शित..
मराठी चित्रपटसृष्टीत वेगळ्या धाटणीचे चित्रपट घेऊन येणारा अभिनेता आणि दिग्दर्शक पुष्कर जोग आता ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ या चित्रपटातून आणखी एक महत्त्वाचा विषय समोर आणत आहेत. या चित्रपटातील प्रेमगीतानंतर ‘डोक्याला शॉट’ हे रॅप साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. वैवाहिक जीवनातील आव्हाने आणि संघर्षावर भाष्य करणारं गाणं एका हटके शैलीत सादर करण्यात आलं आहे.

वरूण लिखाते यांच्या आवाजातील या गाण्याला सलील अमृते यांनी तितक्याच तोडीचे रॉकिंग संगीत दिले आहे. आधुनिक आणि प्रभावी बीट्ससह हा रॅप तरूणांना भावणारा आहे. या गाण्याला पुष्कर जोग आणि वरुण म्युजिशिअन यांचे शब्द लाभले असून या रॅपमुळे एक वेगळाच एनर्जेटिक फील मिळत आहे.
‘डोक्याला शॉट’ रॅप सॉंग हटके आणि नव्या पिढीला थेट भिडणारं आहे. या गाण्याची लय आणि शब्द कॅची असून लूपमध्ये ऐकावे असे हे गाणे आहे. संगीतप्रेमींना थिरकायला लावणारं ‘डोक्याला शॉट’ या रॅप सॉंगला जबरदस्त प्रतिसाद मिळेल, यात काही शंकाच नाही.
चित्रपटाचे दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात, “‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ हा चित्रपट एक गंभीर विषयावर आधारित आहे, पण आम्ही त्यात मनोरंजनाची आणि संवेदनशीलतेची योग्य सांगड घातली आहे. ‘डोक्याला शॉट’ हे गाणं नव्या पिढीच्या विचारशैलीचे प्रतिबिंब आहे. वैवाहिक नात्यातील ताण-तणावांना एक हलकं-फुलकं रूप देत, आम्ही हे गाणं सादर केलं आहे.”
आनंद पंडित मोशन पिक्चर्स प्रस्तुत, गुझबम्प्स एंटरटेनमेंटल यांच्या सहयोगाने ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ चित्रपटाचे दिग्दर्शन व लेखन पुष्कर जोग यांनी केले असून आनंद पंडित, रुपा पंडित आणि पुष्कर जोग निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे सहलेखन नमिष चापेकर यांनी केले आहे. पॅनोरमा स्टुडिओजने या चित्रपटाच्या वितरणाची धुरा सांभाळली आहे.
By Sunder M