‘जारण’मधील अनिता दातेच्या पोस्टरने वेधले सर्वांचे लक्ष
‘जारण’मधील अनिता दातेच्या पोस्टरने वेधले सर्वांचे लक्ष
हृषीकेश गुप्ते लिखित, दिग्दर्शित ‘जारण’ या बहुप्रतीक्षित चित्रपटातील एकेक चेहरे समोर आले असून त्यात अमृता सुभाष, अवनी जोशी, राजन भिसे, सीमा देशमुख, विक्रम गायकवाड, किशोर कदम, ज्योती मालशे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सोशल मीडियावर झळकलेल्या पोस्टरमध्ये या सगळ्यांच्या चेहऱ्यावर टाचण्या टोचल्याचे दिसतेय. हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली असतानाच आता आणखी एका नवीन पोस्टरने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. हे पोस्टर आहे अनिता दातेचे. पोस्टर पाहून तिच्या भूमिकेविषयी प्रेक्षकांमध्ये असंख्य प्रश्न निर्माण झाले असून चित्रपटाबद्दलचे कुतूहलही वाढले आहे. अनिता दातेने आजवर अनेक विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे ही भूमिकाही तिच्या नेहमीच्या भूमिकांसारखी वेगळी असणार, हे नक्की !
पोस्टरमध्ये अनिता दाते अतिशय भयावह रूपात दिसत आहे. तिचे हे रूप पाहाता या सगळ्यामागे तिचाच हात असेल का? हे जाणून घेण्यासाठी आता थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
या चित्रपटाबद्दल अनिता दाते म्हणते, ” हृषीकेश गुप्ते यांची एक कथा वाचली. त्या कथेवर चित्रपट बनवायचे ठरले आणि त्या कथेचा आपण भाग नव्हतो, याचे दुःख झाले. त्याच वेळी मला निर्माते अमोल भगत यांचा फोन आला आणि ‘जारण’मधील महत्वपूर्ण भूमिका त्यांनी देऊ केली. त्यांनी या चित्रपटासाठी माझी निवड केली, त्यामुळे या व्यक्तिरेखेला योग्य न्याय देण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न केले आहेत. अनेक जण म्हणतात मी निवडक चित्रपट करते. तर असे नसून निवडक दिग्दर्शक मला चित्रपटांबद्दल विचारणा करतात. सुदैवाने वेगळया धाटणीचे आणि चांगले चित्रपट माझ्या वाटेला आले आहेत. तसाच ‘जारण’ माझ्या वाटेला आला. हृषीकेश यांचा गूढ कथेत हातखंडा आहे, त्यामुळे हा चित्रपटही उत्कृष्ट असणार, याची मला खात्री होती आणि म्हणूनच मी या चित्रपटासाठी त्वरित होकार दिला. यात माझी महत्वपूर्ण भूमिका असून त्याला अनेक पदर आहेत. अशा भूमिका साकारण्याची संधी पुन्हा पुन्हा येत नाही.”
ए अँड एन सिनेमाज एलएलपी आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिस प्रॉडक्शन प्रस्तुत ‘जारण’ चित्रपट येत्या ६ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी ‘जारण’चे निर्माते आहेत.
By Sunder M