EntertainmentMarathi

 अमेरिकेतील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’ मराठी कलाकारांच्या रेड कार्पेट एन्ट्रीसाठी सज्ज!

‘नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन’ (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे ‘नाफा’ परिवाराने जल्लोषात स्वागत केले आहे. आज, २४ जुलैच्या रात्री ‘नाफा’चे संस्थापक – अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील निवासस्थानी सर्व कलाकारांचा जंगी सत्कार करण्यात आला. या पूर्व-सांस्कृतिक संध्येला कलाकारांच्या उपस्थितीने रंगत आली असून, उत्सवाची बहारदार सुरुवात झाली आहे.

उत्तर अमेरिकेत मराठी चित्रपट लोकप्रिय व्हावेत आणि समृद्ध मराठी संस्कृतीचे दर्शन संपूर्ण अमेरिकेतील प्रेक्षकांना घडावे, या हेतूने ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या चित्रपटांची यशस्वी निर्मिती करणारे राष्ट्रीय सुवर्णकमळ पुरस्कार प्राप्त निर्माते व यशस्वी उद्योजक अभिजीत घोलप यांनी ‘नाफा’ची स्थापना मागील वर्षी केली.त्यांनी सुरू केलेला हा उपक्रम आज एक मोठा सांस्कृतिक सोहळा ठरतो आहे. अभिजीत घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी ‘नाफा’चे सुमारे 100 – 150 स्वयंसेवक गेले काही महिने अथक परिश्रम घेत आहेत.

आज, २५ जुलैपासून ‘नाफा मराठी चित्रपट महोत्सव २०२५’ ला सुरुवात होत असून, सलग तीन दिवस ‘फिल्म एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवसाची सुरुवात भव्य आणि ग्लॅमरस ‘फिल्म अवॉर्ड नाईट’ने होणार आहे. या पुरस्कारांमध्ये ‘नाफा जीवन गौरव पुरस्कार’ नेमका कोणत्या कलावंताला दिला जाणार? या विषयी विशेष औत्सुक्य निर्माण झाले आहे.

हॉलिवूडमधील प्रतिष्ठित ‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये अंथरले गेलेले ‘रेड कार्पेट’, झगमगते कॅमेरे आणि प्रकाशझोतात आलेले मराठी कलाकार – या अविस्मरणीय दृश्यातून मराठी चित्रपटांची अमेरिका वारी किती प्रभावी ठरत आहे, हे स्पष्ट होते. ‘नाफा’च्या या तेजस्वी ‘फिल्म अवॉर्ड नाईट’मुळे संपूर्ण सॅ’न होजे’ शहर उत्सवमय वातावरणात न्हालं आहे. हॉलिवूड नगरीने मराठी तारे-तारकांसाठी रेड कार्पेट अंथरून आपले स्वागताचे दार खुले केले आहे.

यंदाच्या महोत्सवात महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह डॉ. मोहन आगाशे, अमोल पालेकर, सचिन खेडेकर, महेश कोठारे, गजेंद्र अहिरे, अश्विनी भावे, सोनाली कुलकर्णी, संध्या गोखले, स्वप्नील जोशी, अवधूत गुप्ते, आदिनाथ कोठारे, वैदेही परशुरामी आणि मधुर भांडारकर यांसारख्या अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या कलाकारांच्या स्वागतासाठी नाफा टीमचे पदाधिकारी आणि सदस्य – रिया ठोसर, अरुंधती दात्ये, अर्चना सराफ, डॉ. गौरी घोलप, अनूप निमकर, विनायक फडणवीस, वृषाली मालपेकर, योगी पाटील, लक्ष्मण आपटे, गौरी कुलकर्णी, निरंजन पागे, हर्षा, पूजा, निमा, मनीष आणि मानसी देवळेकर – यांच्यासह अमेरिकेतील शेकडो स्वयंसेवक, कलाकार आणि तंत्रज्ञ सज्ज झाले आहेत.

गेल्यावर्षी पासून ‘नाफा मराठी चित्रपट महोत्सव’ कॅलिफोर्नियातील सॅन होजे शहरात मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. यंदा या महोत्सवाची दखल थेट अमेरिकेच्या संसद भवनाने घेतली आहे. अमेरिकेतील मराठी वंशाचे खासदार श्री. ठाणेदार यांनी नुकतेच संसदेच्या सभागृहात या महोत्सवाबद्दल गौरवपूर्वक माहिती दिली.

अधिक माहितीसाठी व सविस्तर कार्यक्रम वेळापत्रकासाठी:

Home

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *