EntertainmentMarathi

जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर ‘नाफा जीवन गौरव – २०२५ पुरस्कारने सन्मानित!

‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोशिएशन’च्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘नाफा जीवन गौरव पुरस्काराने’ यंदा जेष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर यांना गौरवण्यात आले. हिंदी, मराठी, बंगाली, कन्नड, मल्याळम भाषांतील चित्रपटांमध्ये आपल्या दर्जेदार आणि परिपक्व अभिनयाने रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या अमोल पालकरांच्या कार्याचा सन्मान अमेरिकेतील तमाम मराठी प्रेक्षकांच्या उपस्थिती सॅन होजेतील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये २५ जुलै रोजी संपन्न झालेल्या ‘नाफा ग्लॅमरस फिल्म अवार्ड नाईट’ या भव्य आणि दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार आणि नाफाचे संस्थापक अभिजीत घोलप यांसह मराठी चित्रपटक्षेत्रातील अनेक दिग्गज कलावंत, प्रेक्षक उपस्थित होते. “भविष्यात ‘नाफा’च्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये काम करण्याचे स्वप्नं पूर्ण होतील” असे गौरवोद्गार अभिनेते अमोल पालेकरांनी हा पुरस्कार स्वीकारताना काढले.

या सोहळ्यात पुढे बोलताना सन्मानीय अमोल पालेकर म्हणाले, “माझा हा सन्मान केलात, गौरव केला याबद्दल नाफाचे, अभिजीत घोलप आणि तुम्हा सर्व रसिकप्रेक्षकांचे मनापासून आभार. काही वर्षांपूर्वी गौरी देशपांडेंच्या कथेवर बेतलेला सिनेमा करण्याची तयारी मी सुरु केली होती. त्या सिनेमामध्ये निकोल किडमन आणि अमिताभ बच्चन या दोघांना घेऊन मराठी सिनेमा बनविण्याचे माझे स्वप्न होते. आम्ही निकोल पर्यंत पोहचलो, त्याला ती पटकथा आवडली आणि त्याने तात्काळ होकारही दिला. मात्र हॉलिवूड मधील कोणत्याही एका स्टुडिओला सोबत घेण्याची अट घातली. या किचकट गोष्टीची कल्पना असल्याने तो विचार मी सोडून दिला. पण त्यावेळेला जर NAFA सारखी संस्था, असे कार्यकर्ते आणि अभिजित सारखी व्यक्ती असती तर तो प्रकल्प पुढे नेता आला असता. पण आता, NAFAच्या माध्यमातून अशी स्वप्नं पूर्ण होतील, अशी मला आशा आहे.”

जेष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांना हा पुरस्कार प्रदान करतेवेळी नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप म्हणाले, “यंदाचा नाफा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना विशेष आनंद होत आहे. पालेकरांच्या हळुवार, खुसखुशीत रोमँटिक भूमिकांनी आणि त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने तमाम भारतीय प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान आहे. जुबिलीस्टार अशीही त्यांची ओळख भारतीय चित्रपटसृष्टीत आहे, अश्या महान कलावंताचा हा सन्मान अमेरिकेतील तमाम मराठी रसिकांच्या हृदयातून, आपलेपणाने केला जात आहे. पालेकरांनी हा सन्मान स्वीकारून ‘नाफा’चाच सन्मान वाढविला आहे.

अमोल पालेकर हे प्रसिद्ध भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रकार आहेत. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत मोलाची भर घातली आहे. ते एक उत्कृष्ट अभिनेते म्हणून ओळखले जातात, तसेच त्यांनी अनेक यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. त्यांनी ललित कलांमध्ये शिक्षण घेतले आणि ‘सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’ मधून पदवी मिळवली. त्यांनी सुरुवातीला चित्रकार म्हणून काम केले, पण नंतर अभिनयात पदार्पण केले. पालेकर यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘शांतता! कोर्ट चालू आहे!’, ‘गोलमाल’, ‘बातों बातों में’, ‘छोटी सी बात’, ‘रजनीगंधा’, ‘चित्तचोर’, ‘घरौंदा’, ‘मेरी बीवीकी शादी’, ‘नरम-गरम’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘आक्रीत’, ‘बनगरवाडी’, ‘ध्यासपर्व’, ‘कैरी’, ‘अनाहत’, ‘धूसर’, ‘थोडासा रूमानी हो जाय’, ‘पहेली’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यांनी अभिनय केलेल्या सर्वच चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या आहेत.

नाफाच्या फिल्म अवार्ड नाईटची सुरुवात झाली ती ‘रेड कार्पेटवरील एन्ट्रीने. सर्वप्रथम स्वप्नील जोशी एका नव्या लूकमध्ये रेड कार्पेटवर अवतरला. त्याला पाहून प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्या वाजवून त्याचे स्वागत केले. त्यानंतर वैदेही परशुरामी, आदिनाथ कोठारे, अमोल पालेकर आणि संध्या गोखले, सोनाली कुलकर्णी तिच्या मुलीसह, अश्विनी भावे, सचिन खेडेकर, गजेंद्र अहिरे, महेश कोठारे, डॉ. मोहन आगाशे आणि मधुर भांडारकर यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांची एंट्री झाली. या सोहळ्यातील मनोरंजनपर कार्यक्रमात मराठी लोकनृत्याचे सादरीकरण पाहायला मिळाले आणि त्यानंतर कलाकारांना सन्मानचिन्हं देण्यात आली. अवधूत गुप्ते यांना प्रेक्षकांनी ‘बाई बाई मनमोराचा’ आणि ‘आयुष्य हे’ या गाण्यांची फर्माइश केली.

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *