दशावतार’ चित्रपटाच्या निमित्ताने ही लोककला जगभरात पोहोचली- प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा
सध्या महाराष्ट्रासह दिल्ली,गोवा, आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश आदि राज्यांमध्ये ज्या मराठी चित्रपटाचा तुफान डंका वाजतोय, त्या ‘दशावतार’ या ब्लॅाकबस्टर चित्रपटातील कलावंतांना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आग्रहाचे निमंत्रण दिले होते. यावेळी चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह माननीय मुख्यमंत्री, गोवा भाजप प्रदेश अध्यक्ष दामू नाईक, झी स्टुडियोजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देताना मुख्यमंत्री म्हणाले, “सिंधुदुर्ग, कारवार येथे मोठ्या प्रमाणात होणारा दशावतार हा कलाप्रकार गोव्यामध्ये देखील तितकाच लोकप्रिय आहे. मला आनंद आहे, या चित्रपटाच्या निमित्ताने दशावतार ही कला जागतिक पातळीवर जात आहे”. यावेळी त्यांनी ज्येष्ठ कलाकार दिलीप प्रभावळकर यांचा सन्मान केला आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हा चित्रपट जावा, यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दशावतार चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनींगही करण्यात आले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि सर्व मान्यवरांनी या चित्रपटाचा आस्वाद घेतला.
चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर म्हणाले, “एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आमंत्रण द्यावं आणि आम्हाला इथे बोलावणं हा आमच्या चित्रपटाचा मोठा सन्मान आहे. आम्ही कुडाळ आणि गोवा बॉर्डर परिसरातच चित्रीकरण केले आहे.
दशावतार हा लोककलाप्रकार जितका महाराष्ट्राच्या कोकण प्रांतांत लोकप्रिय आहे तितकाच तो गोव्याच्या भूमीतही विशेष प्रसिद्ध आहे. गोव्याच्या सांस्कृतिक परंपरेत दशावतारचे खेळ आजही आपली मोहोर उमटवत आहेत. त्यामुळेच ‘दशावतार’ हा चित्रपट महाराष्ट्राइतकाच गोव्यातील रसिकांनीही डोक्यावर घेतला आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसची निर्मित आणि नव्या दमाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ चित्रपटाने भव्यतेचे एक नवे समीकरण मांडले आहे.
कोकणातील कलासंस्कृती, तिथल्या रूढी परंपरा या थोड्या अधिक फरकाने गोव्याशी साधर्म्य साधणाऱ्या असल्याने ‘दशावतार’ चित्रपटाने गोंयकरांचीही मने जिंकली आहेत.
दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची ‘दशावतार ‘ मध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका असून त्यांच्या अभिनयाची जादू रसिकांना पुन्हा एकदा या चित्रपटात अनुभवता येत आहे. तर महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे , सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर अशा अनेक दमदार कलाकारांच्या या चित्रपटात अत्यंत महत्त्वाच्या भूमिका आहेत. कोकण, सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या लाल मातीतील ‘दशावतार‘ आता भारतभरातच नाही तर जगभरात रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर सगळीकडेच प्रेक्षकांचा झंझावाती प्रतिसाद मिळत असून लहान मुलांपासून ते वयस्करांपर्यंत, मराठीच नाही तर अमराठी प्रेक्षकांमध्येही उदंड लोकप्रियता ‘दशावतार ‘ चित्रपट मिळवत आहे. हा चित्रपट मराठी भाषेत बनलेला असला तरी त्याचा विषय सार्वत्रिक आहे. म्हणूनच तो कुठल्याही भाषेपुरता, प्रांतापुरता मर्यादित नसून त्याची भाषा ही चित्रभाषा आहे. आणि त्यामुळेच भाषा आणि प्रांताची चौकट मोडून तो प्रत्येक रसिक मनाला भिडत आहे.
By Sunder M