EntertainmentMarathi

‘दशावतार’ कथा कोकणची, व्यथा संपूर्ण महाराष्ट्राची!! – शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे

‘ दशावतार ‘या चित्रपटाची कथा जरी कोकणातील असली तरी व्यथा संपूर्ण महाराष्ट्राची आहे. आज आपण कुठे आहोत नि कुठल्या दिशेने चाललो आहोत, हे वेळीच ओळखलं नाही तर आपण एका कडेलोटाच्या टोकावर आहोत, हे दाखवून देणारा हा चित्रपट आहे. सगळ्यांचीच कामं उत्तम आहेत. पण दिलीप प्रभावळकर यांनी जे करून ठेवलंय ते अद्भुत आहे. सुबोध खानोलकर या तरूण दिग्दर्शकाने एक परिपूर्ण चित्रपट मराठीला दिलाय. अशा शब्दांत शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्राचा महासिनेमा ‘दशावतार’ चित्रपटाची प्रशंसा केली.

माननीय उध्दवजी ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘दशावतार ‘ चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी उध्दवजींसह शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत ,शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले, मिलिंद गुणाजी, राणी गुणाजी आणि जागतिक कीर्तीच्या अभिनेत्री छाया कदम उपस्थित होत्या. ‘दशावतार ‘ चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या कामाची उद्धवजींनी प्रशंसा केली. आणि चित्रपटातील कलाकार सिद्धार्थ मेनन, विजय केंकरे, अजित भुरे यांच्यासह संपूर्ण टीमचे कौतुक केले. आपण कित्येक काळानंतर मराठीत असा भव्य चित्रपट पाहिला, ही भव्यता, हे सौंदर्य रसिकांनी रूपेरी पडद्यावरच अनुभवायला हवे. केवळ कोकणातील लोकांनीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राने ही कलाकृती मोठ्या पडद्यावर पहायला हवी, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं. तसंच ‘दशावतार’ ने मराठी चित्रपटाला जी भव्यता मिळवून दिली त्याबद्दल झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर, निर्माता सुजय हांडे, सुबोध खानोलकर , ओंकार काटेसह ‘ दशावतार ‘ च्या सर्वच निर्मात्या मंडळींचे अभिनंदन उद्धवजींनी केले.

 

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *