साईरत्न एंटरटेनमेंट’च्या ‘सोनचाफा’ गाण्यात गौतमी पाटीलचा धुवाधार परफॉर्मन्स, अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस
‘माझ्या रुपावर फिदा झाली दुनिया सारी’ या ‘सोनचाफा’ गाण्यातील ओळींप्रमाणेच नृत्यांगना गौतमी पाटीलच्या रूपावर खरंच दुनिया फिदा आहे, यांत शंकाच नाही. काही दिवसांपासून ‘सोनचाफा’ गाण्याची चर्चा सुरु होती, अखेर या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. गौतमी पाटीलचं दिलखेचक अदांनी भरलेलं हे नवंकोरं ‘सोनचाफा’ हे गाणं आता रसिकांच्या भेटीस आलं आहे. गाण्याच्या ओळींनी आणि गौतमीच्या नृत्याने अर्थातच थिरकायला भाग पाडलं आहे. अल्पावधीतच या गाण्याला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. हे गाणं ‘साईरत्न एंटरटेनमेंट’ या युट्युब चॅनेलवर प्रदर्शित झालं आहे.
यापूर्वीही ‘साईरत्न एंटरटेनमेंट’साठी गौतमी पाटीलने दोन गाणी केली. ‘सुंदरा’ आणि ‘कृष्ण मुरारी’ या गौतमीच्या दोन्ही गाण्यांना भरभरुन प्रतिसाद मिळाला. यानंतर आता ‘साईरत्न एंटरटेनमेंट’ गौतमीसह ‘सोनचाफा’ हे नवं गाणं घेऊन आलं आहे. ‘सोनचाफा’ या आयटम साँगवर गौतमीचा नयनरम्य असा नृत्याविष्कार साऱ्यांना बेधुंद करणारा आहे. गौतमीच्या लूकनेही साऱ्यांना घायाळ केलं आहे. ‘साईरत्न एंटरटेनमेंट’ या प्रॉडक्शन हाऊसच हे गाणं निर्माते संदेश विठ्ठल गाडेकर आणि सुरेश विठ्ठल गाडेकर यांनी निर्मित केलं आहे. दिग्दर्शक अर्चित वरवडे यांनी हे गाणं दिग्दर्शित केलं आहे.

संगीतकार रोहित नागभिडे यांनी संगीत केलेलं हे गाणं गायिका मुग्धा कऱ्हाडे यांनी स्वरबद्ध केलं आहे. तर गाण्याचे बोल वैभव देशमुख यांनी लिहिले आहे. या गाण्याच्या प्रवासाबाबत बोलताना गौतमी पाटील म्हणाली, ”
‘साईरत्न एंटरटेनमेंट’बरोबर हे माझं तिसरं गाणं आहे. सोनचाफा हे गाणं करताना खूप मज्जा आली. गाण्यातील लूक, डान्स स्टेप सगळंच भारी होतं. आणि माझ्या साऱ्या चाहत्यांना हे गाणं नक्की आवडेल याची खात्री आहे”.
तर निर्माते संदेश गाडेकर म्हणाले, “‘साईरत्न एंटरटेनमेंट’ नेहमीच रसिकांसाठी नवनवीन गाणी घेऊन येत असतं. अशातच आता सोनचाफा हे गाणं या यादीत आलं आहे. गौतमीच्या डान्सने तर साऱ्यांना वेड केलं आहे. तिच्या नृत्याचे लाखो चाहते आहेतच आणि आताही या सोनचाफा मधील तिचा परफॉर्मन्स अनेकांच्या मनावर राज्य करत आहे”.
By Sunder M