‘अभंग तुकाराम’ चित्रपटाचा संगीत लोकार्पण सोहळा संपन्न
तुझा पाहूनी सोहळा । माझा रंगला अभंग ।।
गेला शिणवटा सारा । मेघ झाले पांडुरंग ।।
नाम तुकोबाचे घेता । डोले पताका डौलात ।।
या उक्तीची अनुभूती घेत माध्यम प्रतिनिधी आणि रसिकांच्या साक्षीने ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटातील कलाकारांच्या साथीने अदभूत असा आनंद सोहळा नुकताच मोठय़ा उत्साहात आणि भक्तिरसात संपन्न झाला. भक्तीचा ताल, टाळ-मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’नामाचा घोष करत आलेली दिंडी, चित्रपटातील कलाकारांनी केलेले सादरीकरण, गायकांनी सादर केलेले अभंग, तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या भक्ती-शक्ती संगमाचा ऐतिहासिक क्षण ‘याची देही याची डोळा’ रसिकांनी मनात साठवला.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री मा.आशिषजी शेलार यांच्या हस्ते चित्रपटाचा संगीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला. चित्रपटाशी संबंधित कलाकार, तंत्रज्ञ यांचा सत्कार आशिषजी शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना आशिषजी शेलार म्हणाले, ‘आपल्या संस्कृतीचे मूळ आणि महाराष्ट्राच्या भूमीला अपेक्षित असे संतविचार दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि त्यांची टीम चित्रपटाच्या माध्यमातून ज्या यशस्वीपणे पोहचवतायेत, त्यासाठी त्यांचे अभिनंदन. संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५०व्या जयंती वर्षी हा चित्रपट येणे हा सुंदर योग आहे. संत तुकाराम महाराजांची महती माहीत नाही, अशी व्यक्ती या जगात नाही. आपण बोलतो ती वाचा आणि वाचेला दैवी निष्ठेचा परिमळ स्पर्श झाला की, वाचेचे रूपांतर वाणीत होते. संत तुकारामांच्या या वाणीतून लिहिलेले, गायलेले आणि समोर आलेले अभंग मग नादब्रह्मात परावर्तित झाले आणि ऐकणाऱ्याला जो यातून मिळत होता तो ‘ब्रह्मानंद’. ही संतपरंपरा मानणारे आपण सर्वजण आहोत म्हणून महाराष्ट्रात, जगात आणि संत परंपरेवर विश्वास असणाऱ्यांसाठी ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटाचं स्थान अगदी उच्च आहे. संत परंपरेत आणि भक्ती परंपरेत विलीन होण्याची आत्मिक शक्ती आमच्या नागरिकांमध्ये जागृत होऊ दे. इच्छाशक्ती आणि आत्मिक शक्ती एकत्र येते त्यावेळेला ब्रह्मानंदाचे टाळ वाजतात. विठ्ठलाच्या चरणी या चित्रपटाच्या यशाची प्रार्थना करताना या चित्रपटाला त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या.
एका चांगल्या चित्रपटाचा भाग होता आल्याचा आनंद व्यक्त करताना पॅनोरमा स्टुडिओजचे चेअरमन कुमार मंगत पाठक यांनी सांगितले की, हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचवणे आम्हाला गरजेचे वाटले. समाजाला नवा दृष्टिकोन आपल्याला देता यावा म्हणून आम्ही हा चित्रपट घेऊन आलो आहोत. त्याला प्रेक्षकांचा नक्की उत्तम प्रतिसाद मिळेल,असा विश्वास आहे. पॅनोरमा स्टुडिओज ही नामांकित निर्मिती संस्था या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, अजय अशोक पूरकर, दिग्पाल लांजेकर असून सहनिर्माते मुरलीधर छतवानी, रवींद्र औटी आहेत.
थोर संतपरंपरा हे आपले सांस्कृतिक वैभव. प्रापंचिक हलाहल पचवून पुढील पिढ्यांसाठी सद्विचारांचे अभंगामृत ठेवणारे संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे चरित्र म्हणजे दीपस्तंभाप्रमाणे आहे. त्याच तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांमधून जीवन जगण्याच्या तत्त्वज्ञानाची जी शिदोरी दिली, हाच ठेवा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘अभंग तुकाराम’ चित्रपटरूपाने ७ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे.
‘अभंग तुकाराम’ चित्रपटाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांचे आहे. दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी अवधूत गांधी यांनी सांभाळली आहे. अवधूत गांधी, बेला शेंडे, अजय पूरकर, जयदीप वैद्य, अजित विसपुते, चंद्रकांत माने, नूतन परब, अमिता घुगरी, मुक्ता जोशी, ईश्वरी बाविस्कर, ज्ञानेश्वर मेश्राम, केदार जोशी या गायकांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.
चित्रपटाचे छायांकन संदीप शिंदे यांचे आहे. संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. रंगभूषा अतुल मस्के तर वेशभूषा सौरभ कांबळे यांची आहे. संगीत संयोजन आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी मयूर राऊत यांनी सांभाळली आहे. ध्वनी आरेखन निखिल लांजेकर, हिमांशू आंबेकर यांचे आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. नृत्यदिग्दर्शन सुमित साळुंखे तर कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज, संजय करोले यांचे आहे. निर्मिती पश्चात प्रक्रिया सचिन भिल्लारे यांची आहे. व्हीएफएक्स ची जबाबदारी शॉक अँड ऑ फिल्म्स यांनी तर व्हिजुअल प्रमोशनची जबाबदारी कॅटलिस्ट क्रिएटस यांनी सांभाळली आहे. सिनेमन एंटरटेनमेंटचे जय गोटेचा मार्केटिंग डायरेक्टर आहेत. कार्यकारी निर्मात्या केतकी गद्रे अभ्यंकर आहेत.
By Sunder M