EntertainmentMarathi

सासू-सुनेच्या नात्याची नव्या पिढीची गोष्ट – ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई ?’

झी स्टुडिओज व केदार शिंदे घेऊन येत आहेत तुमच्या आमच्या घरातली गोष्ट

झी स्टुडिओज प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमीच नवनवीन आशय असलेले दर्जेदार चित्रपट घेऊन येतात. आता झी स्टुडियोज व केदार शिंदे असाच एक कमाल चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. ‘बाईपण भारी देवा’च्या तुफानी यशानंतर सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज आहेत. महिलांच्या मनातल्या भावना, त्यांच्या नात्यांमधला विनोद आणि संवेदना पडद्यावर आणण्यात हातखंडा असलेले केदार शिंदे आता ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा नवाकोरा चित्रपट घेऊन येत आहेत. झी स्टुडिओज व सनफ्लॉवर स्टुडिओज निर्मित या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून येत्या १६ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक केदार शिंदे यांची कन्या सना शिंदे पहिल्यांदाच निर्मितीची धुरा सांभाळत आहे.

पोस्टरमध्ये सासू-सुनेची जोडी पाठमोरी दिसत आहे. आता सासू-सूनेच्या भूमिकेत कोण दिसेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. प्रत्येक घरात,कुटुंबात घडणारी सासू-सुनेच्या नात्याची मजेशीर केमिस्ट्री, हलकीशी चतुराई, जिव्हाळा आणि न संपणारी टोलेबाजी याचे गोड-तिखट चित्रण लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात, “प्रत्येक घरात सासू-सुनेचं नातं वेगळ्या रंगात दिसतं. कधी हसू, कधी नोकझोक, कधी भांडण तर कधी काळजी आणि प्रेम. प्रत्येकाच्या कुटुंबातील ही दोन वेगळी व्यक्तिमत्त्वं, दोन विचार आणि दोन घर सांभाळणाऱ्या स्त्रियांचं सामर्थ्य या चित्रपटात पाहायला मिळेल. तसेच हा चित्रपट माझ्या खूप जवळचा आहे, कारण या चित्रपटाच्या निमित्ताने सनाने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे आणि ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”

झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात, “ केदार शिंदे हे अत्यंत संवेदनशील दिग्दर्शक आहेत. त्यांनी प्रेक्षकांना नेहमीच दर्जेदार चित्रपट दिले आहेत. या चित्रपटातही असाच काहीसा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई? ’ ही आजच्या पिढीच्या सासू-सूनेची गोष्ट आहे. घरातील प्रत्येक सूनबाई आणि सासूबाईंना ही कथा नक्कीच भावेल आणि त्यांची वाटेल.”

झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल म्हणतात, “ झी स्टुडिओज प्रेक्षकांसाठी वेगळ्या धाटणीचे चित्रपट घेऊन येतात. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासोबत ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट घेऊन येत आहोत. सासू-सूनेच्या नात्याचा हा मजेशीर तसाच भावनिक प्रवास प्रेक्षकांना लवकरच अनुभवता येईल.”

झी स्टुडिओज व सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित ‘अगं अगं सूनबाई !काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून सना शिंदे, उमेश कुमार बन्सल यांची निर्मिती आहे. चित्रपटाची कथा आणि संवाद वैशाली नाईक व ओमकार मंगेश दत्त यांची असून पटकथा वैशाली नाईक यांची आहे. तसेच चित्रपटाचे छायाचित्रण व संकलन मयूर हरदास यांनी केले आहे. येत्या १६ जानेवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

 

By Sunder M

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *